
वारंवार नोटीस पाठवूनही मध्य रेल्वेने वन विभागाच्या भाडे पट्टय़ाचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे थकलेल्या लाखो रुपयांच्या वसुलीसाठी वन विभागाने आज धाडसी कारवाई करीत येथील मध्य रेल्वेच्या हॉलिडे होमला टाळे ठोकून 5 एकर मिळकत ताब्यात घेतल्याची माहिती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
वेण्णालेकच्या मागील बाजूला श्री क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर फॉरेस्ट सर्व्हे नंबर 223 मधील पाच एकर जागा 1978 साली मध्य रेल्वेला वन विभागाने पुढील दहा वर्षांसाठी भाडेपट्टा कराराने दिली होती. या जागेत मध्य रेल्वेने आपले हॉलिडे होम बांधले आहे. वन विभाग व मध्य रेल्वे यांच्यात झालेला करार हा 1988 साली संपुष्टात आला. त्यानंतर मध्य रेल्वेने आपल्या कराराचे नूतनीकरण करणे आवश्यक होते; परंतु त्यांनी ते केले नाही. त्यामुळे 1998 साली वन विभागाने ही मिळकत कारवाई करून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर रेल्वेने आपला करार वाढवून घेतल्याने वन विभागाने पुन्हा पाच एकर जागा मध्य रेल्वेकडे हस्तांतर केली. त्या कराराची मुदत संपुष्टात येताच वन विभागाने नोटिसा पाठवून नूतनीकरण करून घेण्यास सांगितले; परंतु मध्य रेल्वेने वन विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र पाठवून मध्य रेल्वेला कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, मध्य रेल्वेने दुर्लक्ष केल्याने अखेर वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी विशेष पथकासह आज सकाळी रेल्वे हॉलिडे होममधील रेल्वे कर्मचाऱयांना त्यांचे सामान घेऊन बाहेर काढले. हॉलिडे होमच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप लावून ही पाच एकरची मिळकत सील केली आहे.
‘त्या’ 95 मिळकतधारकांनाही इशारा
मध्य रेल्वेप्रमाणेच महाबळेश्वर शहरात, परिसरात वन विभागाने भाडेपट्टय़ाने दिलेल्या एकूण 95 मिळकती आहेत. यापैकी बहुतांशी भाडेपट्टय़ाची मुदत संपुष्टात आलेली आहे. भाडेपट्टय़ांच्या मिळकतींचे करार संपुष्टात आलेले असलेल्यांनी लवकरात लवकर भाडे कराराचे नूतनीकरण करून घ्यावे; अन्यथा आपल्या मिळकतीही वन विभाग सील ठोकून आपल्या ताब्यात घेईल, असा इशारा वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे. दरम्यान, वन विभागाच्या या भूमिकेमुळे मिळकत धारकांचे धाबे दणाणले आहे.






























































