
सामना प्रतिनिधी, जामखेड
परवान्याची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण न केल्यामुळे, तसेच आरा मिलसाठी आवश्यक असलेल्या अटींची पीर्तता न केल्यामुळे दीड महिन्यापासून विनापरवाना चाललेल्या शहरातील लक्ष्मी सॉ मिलला आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन सील केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरवर्षी सॉ मिलला परवाना घेणे आवश्यक असते परंतु शहरातील लक्ष्मी सॉ मिलचा परवाना डिसेंबर 2018 मध्ये पर्यंत होता परवाना नूतनीकरण करणे गरजेचे असताना नूतनीकरण केले नाही.
सॉ मिल फक्त दिवसभर चालवण्याचा परवाना असतो दिवस मावळल्यावर मशीन चालवता येत नाही. अनेक वेळा रात्रीही मशिन चालू असते. आरा मशिनसाठी कडेने कुंपन (संरक्षण भिंत) आवश्यक असते. कडेने संरक्षक भिंत नाही. आरा मशिनवर कटई करण्यासाठी आलेल्या लाकडाची योग्य प्रतवारी लावणे आवश्यक असते. तशी प्रतवारी आढळून आली नाही. असे अनेक नियम परवाना देताना आरा मशिनला बंधनकारक आसतानाही येथील लक्ष्मी सॉ मिल मध्ये अनेक त्रुटी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणी अंती आढळून आल्याने वनविभागाने 17 रोजी अचानक तपासणी करून लक्ष्मी सॉ मिलला सील ठोकले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड वनपाल खराडे ए. बी., पवार ई. व्ही, राठोड, वनकर्मचारी राजेंद्र मुरुमकर, रामभाऊ मुरुमकर, अंकुश गवळी, श्याम डोंगरे यांनी मिलमध्ये जाऊन कागदपत्रे पाहणी केली व नूतनीकरण न केल्यामुळे व अनेक त्रुटी असल्याने वनविभागाने मिलला सील ठोकले आहे. याबाबत मिलचे मालक अंबादास पोकळे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्या घरगुती वादामुळे परवाना नुतनिकरण करण्याचे राहिले आहे. लवकरात लवकर नूतनीकरण केले जाईल. व इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल. आरा मशीनसाठी अनेक नियम व अटी लागू आहेत. तसेच दरवर्षी परवाना नुतनिकरण करणे गरजेचे आहे. वरील अटीची पुर्तता न केल्यास आरा मशिनचा परवाना कायमस्वरूपी जप्त होऊ शकतो.


























































