
परदेशी श्वानाचे पिल्लू विक्रीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका तरूणाला ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी तरूणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीने सोशल मीडियावर परदेशी श्वान विक्रीची जाहिरात पोस्ट केली होती. त्यानुसार तरूणाने जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरट्याने श्वानाच्या पिल्लाचे छायाचित्र तक्रारदार तरूणाला पाठविले होते. श्वान घरपोच आणून दिले जाईल, असे त्याला सांगण्यात आले होते. त्यानंतर तरूणाने आरोपीच्या खात्यात 9 हजार रुपये पाठविले.
पैसे पाठवूनही श्वान न मिळाल्याने तरूणाने आरोपीला संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा श्वानाचे पिल्लू मरण पावल्याची बतावणी आरोपीने केली. पैशांबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने उडवाउडवीचे उत्तरे देऊन पैसे परत केले नाही. याबाबत पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे तपास करत आहेत.



























































