
भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदीभक्तांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. ते दररोज मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात. यामुळे त्यांना मोदींच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींकडे त्यांचे अंधभक्त आहेत. मोदींनी त्यांना त्याच कामासाठी ठेवले असून ते मला पैसे घेऊन शिवीगाळ करतात. परंतु मी माझे स्वतःचे ट्विट स्वतःच करतो.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे मोदी समर्थकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मोदींचे अर्धवट शिकलेले भक्त माझ्या पीएचडीशी स्पर्धा करू शकत नाहीत. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ट्विटरवरील मोदीभक्तांची समस्या हीच आहे की ते अर्धवट शिकलेले आहेत. ते माझ्या पीएचडी आणि ज्ञानावर आधारित असणाऱ्या ट्विटशी स्पर्धा करू शकत नाहीत. ते सर्व मंदबुद्धी असल्याप्रमाणे वर्तन करतात आणि मूर्खासारखी शिवीगाळ करतात ज्यामुळे ते ब्लॉक होतात. हे दयनीय आहे!
दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, माझे 10 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असून ते खरे आहेत, परंतु मला अपमानास्पद ट्विट करणाऱ्या बहुतेक युजर्सचे फक्त 10 ते 20 फॉलोअर्स आहेत. त्यांना ट्विटरवर हे सर्व करण्यासाठी पैसे मिळतात.
सुब्रमण्यम स्वामींनी भाजपवर पहिल्यांदाच निशाणा साधलेला नाही, याआधीही ते आपल्या वक्तव्यावरून केंद्र सरकारला घेरत आले आहेत. यंदाच्या वर्षी 23 मे रोजी त्यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ट्विटरवर मोदी आणि माझ्यात फरक असा आहे की त्यांनी हिरेन जोशी यांना अंध भक्त आणि गांधभक्तांना पैसे देऊन मला आणि माझ्या कुटुंबाविरोधात सर्वाधिक अपशब्द वापरण्यासाठी नियुक्त केले आहे.
स्वामींनी लिहिले की, मी माझे स्वतःचे ट्विट स्वतः करतो आणि स्वतःला एका वर्तुळापुरते मर्यादित ठेवतो. हे दोन्ही बाजूंनी थांबवायला हवे नाहीतर हे असेच चालू राहील. किंबहुना, सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला आहे की, गेल्या काही वर्षांपासून भाजप आयटी सेल त्यांना सतत टार्गेट करत आहे. स्वामी म्हणाले होते की, भाजपच्या आयटी सेलने त्यांच्याविरोधात बनावट अकाऊंटवरून ट्विट केले होते. त्यांनी याबाबत मोदींकडे देखील तक्रार केली आहे. तरीदेखील हे चक्र सुरूच आहे.



























































