
हिंदुस्थानचे अनेक खेळाडू एकामागोमाग एक संन्यास घेत असून अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्यासाठी रवाना होत आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंद यानेही हिंदुस्थानच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता आणखी एका खेळाडूने हिंदुस्थानमध्ये क्रिकेटला रामराम करत अमेरिका गाठण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्मुक्त चंद याच्यानंतर दिल्लीचा फलंदाज मिलिंद कुमार याने हिंदुस्थानच्या क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. अमेरिकेतील यूएसए लीग क्रिकेट खेळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत मिलिंद फिलाडेल्फियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. मिलिंद आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडूनही खेळला आहे.
आपल्या निर्णयाबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना मिलिंद म्हणाला की, ‘संन्यासाच्या निर्णयाबाबत मी बीसीसीआयला माहिती दिली आहे. मला विराट कोहली, शिखर धवन आणि इशांत शर्मा यासारख्या दिग्गज खेळाडूंसोबत क्रिकेट खेळून आनंद वाटला. आता पुढे वाटचाल करण्याची वेळ आली आहे.’
हिंदुस्थानला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या 28 वर्षीय खेळाडूची अचानक निवृत्ती, ‘या’ देशाकडून खेळणार
अनेक खेळाडूंची अमेरिकेकडे कूच
दरम्यान, मिलिंद कुमार याच्या आधी स्मित पटेल, उन्मुक्त चंद, मनन शर्मा यांनीही अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्यासाठी हिंदुस्थानच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. उन्मुक्त चंदसारख्या बड्या खेळाडूने निवृत्ती घेत अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला होता. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये डावलले गेल्याची भावना उन्मुक्त चंदच्या मनात निर्माण झाल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते.



























































