माजी मंत्री प्रकाश सोळुंकेंचा अॅक्शन प्लॅन, भाजपा धास्तावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

विधानसभा निवडणूक वर्षभरावर असली तरी माजलगाव मतदार संघात मात्र वातावरण तापले आहे. संभाव्य उमेदवाराची धावपळ सुरू झाली आहे. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी तर माजलगाव मतदार संघातील 215 गावांना थेट भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. प्रकाश सोळंके यांच्या जनसंपर्क अभियानाने भाजपा धास्तावली आहे.

बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघ हा नेहमीच राजकारणाच्या बाबतीत संवेदनशिल समजला जातो. आतापर्यंतच्या सर्वच निवडणुका प्रतिष्ठेच्या आणि अस्तित्वाच्या झाल्या आहेत. गत निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार आर.टी.देशमुख यांनी मजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा पराभव करून सोळंकेंच्या विजयाची साखळी तोडली होती. सतत तीन वेळा निवडून येण्याचा पराक्रम प्रकाश सोळंके यांनी केला होता. चौथ्यांदा भाजपाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. आता पराभवाची पुर्नरावृत्ती नको म्हणून माजी महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या दोन महिन्यापासून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. दुष्काळ पाहणी अभियान राबवत प्रकाश सोळंके यांनी 215 गावांना आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला आहे. गावागावात जाऊन सरकारचे अपयश आणि ग्रामिण भागातील दुरावस्था यावर ते भाष्य करत आहेत. तसा प्रकाश सोळंके यांना मानणारा मतदार या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. कारखान्याच्या माध्यमातून कार्यकत्र्यांचे जाळे विणल्या गेले आहे. अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी राबवलेल्या जनसंपर्क अभियानाामुळे भाजपा माजलगाव मतदार संघामध्ये धास्तावली आहे.