
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धूळवड चांगलीच रंगली आहे. राज्यात पक्षांतराचा धडाका सुरूच असून योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले दारा सिंह चौहान, ‘अपना दल’चे आमदार डॉ. आर. के. वर्मा यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला, तर त्यावर पलटवार करीत भाजपने थेट सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या घरी सुरुंग लावला आहे. मुलायम यांची धाकटी सूनबाई अपर्णा यादवही भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहेत. यापैकी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींनी चांगलाच धुरळा उडवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे सत्र सुरू आहे. याचदरम्यान राज्याच्या वन आणि पर्यावरण मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या दारा सिंह चौहान तसेच भाजपचा मित्र पक्ष असलेल्या ‘अपना दल’चे आमदार डॉ. आर. के. वर्मा यांनी रविवारी सपामध्ये प्रवेश केला.
माजी पोलीस आयुक्त भाजपात;
सपा तक्रार करणार
बडया नेत्यांच्या पक्षांतराचे सत्र सुरू असतानाच कानपूरचे माजी पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी अनुराग यांनी सपाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यावर थेट निशाणा साधला. दंगेखोर सपामध्ये जातात, असे ते म्हणाले. असीम यांच्या भाजप प्रवेशासंबंधी अखिलेश यादव निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. असीम यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पोलिस अधिकार्यांना हटवावे, कारण त्यांच्या राजकीय प्रवेशाचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
मुलायमसिंह यादव यांची सूनबाई भाजपच्या वाटेवर
आमदार-मंत्र्यांची सतत गळती लागल्यामुळे धक्का बसलेल्या भाजपने सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची धाकटी सूनबाई अपर्णा यादव यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हालचालींना गती दिली आहे. अपर्णा लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांना भाजपकडून लखनौ कॅन्ट मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय किसान युनियनचा ‘सपा–रालोद’ला पाठिंबा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय किसान युनियनने समाजवादी पार्टी व राष्ट्रीय लोक दलाच्या युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी रविवारी याबाबत घोषणा केली. त्यांनी सपा-रालोद युतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करतानाच ही निवडणूक ‘प्रतिष्ठेची लढाई’ समजून लढण्याचे आवाहन केले. सपा-रालोद युतीने शनिवारी सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.





























































