किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले शिवनेरीवर देखील शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

सकाळी गडदेवता शिवाई मातेची पूजा आणि अभिषेक विक्रमसिंह जयवंतराव बाजी मोहिते व सेवानिवृत्त ब्रिगेडीयर प्रसाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिरापासून शिवजन्म स्थळापर्यंत बालराजांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शिवकुंज येथे महिलांनी पारंपरिक पाळणा म्हणून शिवजन्म सोहळा साजरा केला. त्यानंतर ध्वजारोहण व धर्मसभा संपन्न झाली. शाहीर हेमंत मावळे यांनी पोवाडे म्हणून शिवजागर करीत शिवरायांचा इतिहास जागवला. यावेळी शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे, रमेश कर्पे तसेच हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यात राजमाता जिजाऊ पुरस्कार जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्त्या अलकाताई फुलपगार यांना प्रदान करण्यात आला. सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने दीपोत्सव करण्यात आला. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगांव येथून काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत सुमारे 500 दुचाकी स्वार सहभागी झाले होते. भगवे फेटे व भगवे उपरणे धारण केलेल्या महिला व पुरुष शिवभक्तांमुळे अवघे वातारण शिवमय झाले होते.