
पक्ष्यांच्या जीवनात स्थलांतराच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. प्रतिकूल वातावरणापासून बचाव करण्यासाठी आणि प्रजननासाठी पक्षी स्थलांतर करतात. हिवाळ्याच्या दिवसांत किंवा ऋतुमानानुसार अनेक पक्षी स्थलांतर करतात. या काळात पक्षी कोठून येतात, त्यांचा मार्ग, प्रवासाचा काळ, आयुष्य , सुरक्षितता, स्थलांतर करताना त्यांना मिळणारे खाद्य यावर वर्षानुवर्षे संशोधक अभ्यास करत आहेत.
आता प्रदूषित वातावरणामुळे आणि सध्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात पक्ष्यांनाही विविध विषाणुंचा धोका आहे. गेल्या काही दिवसांत बऱ्याच ठिकाणी पक्ष्यांच्या मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संशोधकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
देशातल्या काही राज्यांमध्ये अचानक पक्ष्यांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांच्या आजारात वाढ होते. देशात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरू असताना राजस्थानच्या बरा, कोटा, पाली, झालावर या भागात अचानक शेकडो कावळे मरून पडले. या मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू या रोगांचे विषाणू आढळून आले. त्यामुळे संपूर्ण राजस्थानात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील इंदूरमध्येही 50 कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळला आहे. हिमाचल प्रदेशातील पोंग डैम परिसरात 1,400 पेक्षाही जास्त प्रवासी पक्ष्यांचा मृत्यू झाला, गुजरातमध्ये 53 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे काही ठिकाणी हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र सातत्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये पक्षी मरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी भोपाळमधील हाय सिक्युरीटी अॅनिमल डीसीज लॅबमध्ये या मृत पक्ष्यांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी जलाशयामध्ये पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम करण्यास सरकारतर्फे बंदी घालण्यात आली आहे.
पक्ष्यांमध्ये एच 5 एन 8 व्हायरस
इंदुरमधील खासगी महाविद्यालयाच्या परिसरात मृत्यू झालेल्या कावळ्यांपैकी 2 कावळ्यांमध्ये एच 5 एन 8 व्हायरस सापडला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागातंर्गत कार्यरत असलेल्या पशु चिकित्सा विभागाद्वारे संशोधन करण्यात येत आहे. यावर आयडीएसपीचे अतिरिक्त संचालक डॉ. शैलेष साकल्ले यांच्यामार्फत रोग निर्मूलन कार्यक्रम आखण्यात येत आहे.





























































