
कला केंद्रात गाण्याच्या बारीवरून झालेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर याच्या भावाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी यवत पोलिसांनी आमदार मांडेकर यांच्या भावासह चौघांना अटक केली आहे.
बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. वाखारी परिसरात न्यू अंबिका कला केंद्र असून, त्याङ्गिकाणी 21 जुलैला रात्री आरोपी मांडेकर, जगताप, मारणे, आव्हाड हे गाण्याच्या बारीसाठी गेले होते. त्यावेळी एका पार्टीने अगोदरच बारी बुक केल्यामुळे आरोपी मांडेकरसह साथीदारांचा संबंधितांसोबत वाद झाला. त्याच रागातून चौघेही आरोपी कला केंद्रातून बाहेर आल्यानंतर साडेअकराच्या सुमारास मांडेकरने हवेत गोळीबार केला होता. गोळीबार झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
गोळीबारप्रकरणात तक्रारदार कुणीही पुढे येत नव्हते. कला केंद्राच्या मालकानेही गोळीबार झालाच नसल्याचे सांगितले होते. मात्र, मॅनेजरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार चौघांविरूद्ध यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर याच्यासह त्याचे साथीदार गणपत जगताप, चंद्रकांत मारणे रघुनाथ आव्हाड यांनाही पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
आमदार मांडेकर म्हणतात चार भावांपैकी एक चोर असतो, एक देव असतो माझ्या भावाकडे बंदुकीचा परवाना नसून, तो शेती करतो. तो वारकरी संप्रदायातील असून, कोणी कुठे जावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी काय खावं, काय प्यावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ही घटना घडल्यावर तो सकाळी घरी आला होता. पण भावाने मला काही सांगितले नाही. याप्रकरणी पोलिसांनी मला पह्न करून गोळीबाराची माहिती दिली. घडलेली घटना निंदनीय असून, चार भावांपैकी त्यातला एक चोर असतो, एक देव असतो. चुकीचं प्रायश्चित त्याला शासन देईल, अशी प्रतिक्रिया आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.