चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, प्रवेशकर्त्याचे मालवणात जंगी स्वागत

2172


मालवण पालिकेतील विरोधी पक्षाचे नेते मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, शीला गिरकर, दर्शना कासवकर या चार नगरसेवकांनी मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या चारही नगरसेवकांचे सोमवारी मालवण शिवसेनेच्यावतीने ढोल, ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले.

शिवसेना कार्यालयात माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते या चारही नगरसेवकांचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, आरोग्य सभापती पंकज सादये, नगरसेवक नितीन वाळके, विनायक परब, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, अंजना सामंत, देवयानी मसुरकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, अनुष्का गावकर, पूजा तोंडवळकर, पंकज वर्दम, नारायण कुबल, समीर हडकर, समीर लबदे, यशवंत गावकर, किरण वाळके, तपस्वी मयेकर, अमित भोगले, दर्शन म्हाडगुत, दीपक देसाई, आबा खोत, भाई कासवकर, बंड्या खोत, शिल्पा खोत, पूनम खोत, नितीन घाडी, नागेश चव्हाण, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी उत्स्फुर्तपणे प्रवेशकर्त्याचे स्वागत केले

शिवसैनिकांनी केलेल्या स्वागताने आम्ही भारावून गेलो आहोत. तालुक्यात आमदार वैभव नाईक यांनी चांगले काम केले आहे. शिवसेना संघटनेचे काम आम्हाला आवडले आहे. तालुक्यात कोणत्याही पदाच्या शर्यतीत मी नाही. पक्ष संघटना वाढविण्यावर भर देणार आहे. हरी खोबरेकर, बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना वाढीचे काम येत्या काळात करू. येत्या निवडणुकीत 90 टक्के मताधिक्य आमदारांना मिळवून देऊ असा विश्‍वास केणी यांनी व्यक्त केला.

कोणतीही अपेक्षा न ठेवता शिवसेना प्रवेश
मंदार केणी यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होतील. गेल्या काही वर्षाच्या काळात केणी व त्यांच्या सहकार्‍यांनी चांगले काम केले आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करतो. येत्या काळात विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे. विधानसभेत अपेक्षित यश शिवसेनेला मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या