
नवीन कामगार कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे, कंपन्यांना आता चार दिवसीय कामाच्या आठवड्याची परवानगी देणे शक्य झाले आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 12 डिसेंबर रोजी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली.
नवीन कामगार कायद्यानुसार एका आठवड्यात कामाचे कमाल तास 48 इतके निश्चित केले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर एखादी कंपनी एका दिवसात 12 तासांची शिफ्ट ठेवण्यास तयार असेल, तर कर्मचाऱ्याला आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करावे लागेल आणि उर्वरित 3 दिवस ‘सशुल्क सुट्टी’ मिळू शकते.
मंत्रालयाने हेदेखील स्पष्ट केले आहे की, 12 तासांच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्याच्या विश्रांतीचा किंवा स्प्रेड-ओवरचा वेळदेखील समाविष्ट असेल. एखादी कंपनी कर्मचाऱ्याला एका आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम करायला लावत असेल, तर नियमांनुसार, दैनंदिन वेळेपेक्षा जास्त केलेल्या ओव्हरटाईमसाठी कंपनीला दुप्पट पेमेंट देणे बंधनकारक आहे.



























































