
उत्तर कश्मीरच्या कुपवाडा जिह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. यात लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर गोळीबारात लष्करातील कॅप्टनसह चार जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा मोठा कट उधळून लावला. नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) माछिल प्रांतात ही चकमक उडाली.
दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफचे पेट्रोलिंग युनिट नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री गस्त घालत होते. यादरम्यान मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एलओसीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यावर बीएसएफच्या जवानांनी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू करीत घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळीबाराला सुरुवात झाली. यात बीएसएफचे कॉन्स्टेबल सुदीप सरकार शहीद झाले, तर एक दहशतवादी ठार झाला. दहशतवाद्याजवळ एके-47 रायफल आणि दोन बॅग सापडल्या. ही चकमक पहाटे चार वाजता थांबली.
– एलओसीपासून दीड किलोमीटर अंतरावर रविवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा चकमक सुरू झाली. त्यात दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत असताना लष्कराचे चार जवान शहीद झाले, तर अन्य दोन जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आले. शहीद जवानांची नावे समजू शकलेली नाहीत.


























































