
माणकोली उड्डाणपुलामुळे ठाणे-डोंबिवली प्रवास काही मिनिटांतच करणे शक्य होते. मात्र मोठागाव रेल्वे फाटक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी मोठागाव रेल्वे फाटकाजवळ चार लेनचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या पुलासाठी शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे डोंबिवलीतील वाहतूककोंडी फुटणार आहे.
मोठागाव रेल्वे फाटक परिसरात नेजहमीच वाहतूककोंडी होत असते. दोन लेनच्या पुलाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते मात्र दोन लेनचा पूल वाढत्या वाहतूक समस्येवर उतारा होणार नाही हे लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे चार लेन पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. वारंवार पत्रव्यवहार, बैठकांमधील चर्चासत्रे तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे चार लेन पुलाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अखेर रेल्वे प्रशासनाने चार लेनचा पूल मंजूर केला. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामातील अडथळ्यांचा आढावा घेतला. तसेच संबंधित महापालिका आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
आठ महिन्यांत काम पूर्ण
रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला गती मिळाली असून आठ महिन्यांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त गोयल यांनी दिली. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली आणि मानकोली परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे. या प्रकल्पात भूमी संपादनासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण १३० कोटी रुपयांचा रोख स्वरूपातील मोबदला देण्यात येणार आहे. हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा पहिला प्रकल्प आहे ज्यात शेतकऱ्यांना मोबदला थेट रोख स्वरूपात मिळणार असे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.



























































