
नागपूर-कामठी मार्गावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या ‘रेव्ह पार्टी’चा पोलिसांनी भंडाफोड केला असून याप्रकरणी चार जणांबरोबर चार महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-5, सामाजिक सुरक्षा विभाग व एएचटीयू पथकाने ही कारवाई केली.
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस. फार्म येथे शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यानंतर पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तेथे पार्टी सुरू असल्याचे आढळले. पार्टीत अमली पदार्थांचे सेवनदेखील सुरू होते. पोलिसांनी सुनील अग्रवाल (61), गौतम जैन (51), नीलेश गडिया (61), मितेश खक्कर (48) यांना तत्काळ अटक केली. आरोपी अमली पदार्थांचे सेवन करत होते. त्यांच्यासोबत असलेल्या चार महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी आणि घटनास्थळावरून पोलिसांनी 1.31 ग्रॅम एमडी पावडर, हुक्का पॉट, रोख 58 हजार, सहा मोबाईल, दोन कार असा 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात एनडीपीएस तसेच कोटपा अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, ललिता तोडासे, मनोज घुरडे, विजय यादव, मनोज नेवारे, शैलेश डोबोले, पवन गजभिये, विवेक अडाऊ, अरविंद गेडेकर, गणेश जोगेकर, रोहित काळे, सुभाष गजभिये, अमन राऊत, सहदेव चिखले, राहुल पाटील, अनुप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.