
पैसे न दिल्याने शिवीगाळ करणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा प्रकार 10 जुलैला घडला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दुचाकीवर असलेल्या ‘श्री’ अक्षरावरून खूनाचा उलगडा करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. रोहित गौतम बनसोडे (वय 27, रा. उंड्री), अजय विजय गायकवाड (वय 22), श्रीकांत भिमराव साठे (वय 20, दोघेही रा. कृष्णानगर, महमंदवाडी) आणि अक्षय अनिल जाधव (वय 20, रा. आझादनगर, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहन सिंग आणि सतीश गायकवाड फरार आहेत. कोंढवा खुर्द येथील भवानी चाळीत राहणाऱ्या मुलाचे अपहरण करून खून करण्यात आला होता. अल्पवयीन मुलगाही गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यात 9 जुलैला 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर 10 जुलैला जंगलात मूलाचा मृतदेह आढळून आला. सीसीटिव्ही फुटेजनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. त्यामध्ये दोनजण मुलाला स्कुटीवर बसवून घेऊन जाताना दिसत होते. मात्र, दुचाकीचा नंबर फुटेजमध्ये अस्पष्ट दिसत होता. मात्र, स्कुटीवर ‘श्री’ हे अक्षर स्पष्ट दिसत होते.
कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या रोशन सिंगच्या घरासमोर नंबर प्लेट नसलेली दुचाकी लावली असल्याची माहिती पोलीस शिपाई किशोर वळे यांना मिळाली. गाडीवर ‘श्री’ अक्षर असल्याचेही त्यांना दिसून आले. त्यावरून पोलिसांनी रोशन सिंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सांगितले की, ”रोहन सिंग आणि रोहित बनसोडे यांनी सतीश गायकवाडच्या सांगण्यावरून 8 जुलैला दुपारी 3 वाजता अल्पवयीन मुलाला कोंढवा येथील गोल्डन बेकरीजवळ भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते मुलाला घेउन हेवन पार्कच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात घेऊन गेले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला दारू पाजून त्याचा दगडाने ठेचून खून केला.” ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी चारजणांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, संतोष नाईक, सुशील धिवार, निलेश वणवे यांच्या पथकाने केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करत आहेत.





























































