सर्वोच्च न्यायालयात 4 न्यायमूर्तींसह 150 जण पॉझिटिव्ह; संसदेतील 402 कर्मचारी, सुरक्षा रक्षकांना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून या विषाणूने आता सर्वोच्च न्यायालयातही हजेरी लावली आहे. न्यायालयातील चार न्यायमूर्ती आणि 150 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईप्रमाणेच नवी दिल्लीतही मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयातही दक्षता घेतली जात आहे. मात्र दक्षता घेऊनही न्यायालयातील 3000 कर्मचाऱयांपैकी 150 कर्मचाऱयांना तसेच 32 न्यायमूर्तींपैकी चार न्यायमूर्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे न्यायालयातच कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात येणारा कर्मचारी वर्ग तसेच सुनावणीवेळी येणारे लोक, वकील या सर्वांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ टेस्ट करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संसदेतील 402 कर्मचारी, सुरक्षा रक्षकांना कोरोना

देशात कोरोना आणि ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून कोरोना आता संसद भवनातही पोहोचला आहे. संसदेतील 402 कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 6 आणि 7 जानेवारीला संसदेत काम केलेल्या कर्मचाऱयांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

4 ते 8 जानेवारीला संसदेत काम केलेल्या 1 हजार 409 कर्मचाऱयांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 402 कर्मचाऱयांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तसेच ओमायक्रोनचा धोका लक्षात घेऊन या सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. या 402 अधिकाऱयांपैकी लोकसभेच्या 200, राज्यसभेच्या 69 तर इतर 133 कर्मचाऱयांना कोरोना झाला आहे. या कर्मचाऱयांना आरोग्य विभागाच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले असून हे सर्व कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये आहेत.