
शहरात फिरणारे चारचाकी वाहनधारक व रिक्षाचालक प्रवाशांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले असून, प्रमाणपत्र नसणाऱयांविरुद्ध पोलीस दंडात्मक कारवाई करणार आहेत. या संबंधीचे आदेश पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी काढले आहेत.
सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची कठोर अंमलबजावणी करत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनानंतर ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणासंबंधी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. सध्या कर्मचाऱयांच्या संपामुळे एस. टी. बससेवा बंद आहे. त्यामुळे आरटीओच्या परवानगीने खासगी वाहनांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. खासगी वाहन चालविणारा चालक व प्रवासी तसेच शहरातील रिक्षाचालक व त्यातील प्रवासी यांनी दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे सक्तीचे करण्यात आले आहे. नाहीतर आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
शहरात पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा आणि आरटीओ यांच्या संयुक्त पथकाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर निगेटिव्हचे रिपोर्ट असणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी दिले आहेत.



























































