
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या सेवा समाप्त करून यापुढे कंत्राटी पद्धतीने नेमणुका करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात उद्या, 18 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद राहणार आहेत. राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या नेतृत्वाखाली हे शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
11 डिसेंबर रोजी नवीन आकृतीबंधाचा एक आदेश काढून भविष्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या सेवा कायमस्वरूपी संपवून यापुढे कंत्राटी पद्धतीने त्यांची नेमणूक करण्याचा शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला. या नवीन आकृतीबंधाच्या निषेधार्थ राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना सहभागी झाल्या आहेत.
आंदोलनात सहभागी होणाऱया संघटना
शिक्षण संस्था महामंडळ, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, मुपटा शिक्षक संघटना, शिक्षक सेना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक क्रांती, कास्ट्राईब संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघ, प्राथमिक मुख्याध्यापक संघ, पुरोगामी शिक्षक संघटना, प्रबळ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुकटा संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, कला शिक्षक महासंघ, विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समिती, शिक्षक भारती.






























































