बनावट कागदपत्रांद्वारे सव्वासात लाख रुपयांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैराग येथील विद्या मंदिर कन्या प्रशालेतील शिक्षिका, निवृत्त मुख्याध्यापिका, लिपिक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून संस्था व शासनाची सव्वासात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पद्मा योगिराज साखरे, जित्तुन्निसा खुदाबक्ष जहागिरदार, नंदकुमार धन्यकुमार रणदिवे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बार्शी तालुक्यातील वैराग येथे विद्या मंदिर कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आहे. येथे मुख्य आरोपी नंदकुमार रणदिवे हे वरिष्ठ लिपिक होते. याच संस्थेत त्यांचा पुतण्या असून, त्यांनी संस्थेची खोटी कागदपत्रे तयार करून वरिष्ठ वेतनश्रेणी परस्पर मिळवून रक्कम लाटली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग व शासनाने सदरची रक्कम व्याजासह भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची मुलगी डी. एड. असून, तिलाही संस्थेत नोकरी लावण्यासाठी दबाव आणत होता.

कनिष्ठ महाविद्यालयात सेवेत असलेल्या शिक्षिका पद्मा साखरे या शिक्षण सेविकापदी कार्यरत असताना पूर्णवेळ दाखवून बनावट कागदपत्रे तयार केली. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करून 7 लाख 29 हजार 990 रुपये त्यांनी वेतनापोटी घेतले. ही बाब उघडकीस आल्यानंतर तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष जयंत भूमकर यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दिल्यानंतर व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी मृणाल जयंत भूमकर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आणखी एका गुह्यात संस्थेची बनावट कागदपत्रे तयार करणे, अधिकार नसताना सह्या करणे व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त लिपिक नंदकुमार रणदिवे, निवृत्त मुख्याध्यापिका जित्तुन्निसा जहागिरदार व शिक्षिका पद्मा साखरे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलीस शिपाई जाधव अधिक तपास करीत आहेत.