
<<< आशिष बनसोडे >>>
पाकिस्तानसोबतचा संघर्ष टोकाचा चिघळलेला असतानाही आपल्या देशाशी गद्दारी करत पाकड्यांसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अलीकडेच तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशा हेरगिरी करणाऱ्यांना वेळीच रोखण्यासाठी तपास यंत्रणा कसून प्रयत्न करत असतानाच सायबर भामट्यांनी मात्र याचा गैरफायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्याची धमकी दाखवत सायबर गुन्हेगारांनी एका वृद्धेला 22 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दक्षिण मुंबईत त्या 64 वर्षीय वृद्धा राहतात. ग्रॅण्टरोड परिसरातील त्या आपल्या घरी असताना 5 जून रोजी त्यांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आला होता. मग 5 ते 10 जून दरम्यान तीन वेगवेगळ्या नंबरवरून वृद्धेला कॉल करण्यात आले. कॉलरने त्याची ओळख दिल्ली एटीएसचा पोलीस निरीक्षक प्रेम कुमार गुप्ता अशी सांगून तो जम्मू-कश्मीर बॉर्डर पोलीस स्टेशनचा असल्याचे सांगून गंडा घातला.
… मॅनेज करतो
हेरगिरी प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी घाबरलेल्या वृद्धेनेदेखील कसलीही शहानिशा न करता आरोपीला त्याने सांगितले त्या बँक खात्यांवर एकूण 22 लाख 40 हजार रुपये पाठवले. पैसे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दिली.
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली….
तुमच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तुम्हाला अटक होईल, 50 लाखांचा दंड आणि 10 वर्षे कारावास अशी शिक्षा या गुह्यांत असल्याचे भामटय़ांनी वृद्धेला सांगितले. हे ऐकून त्या हादरल्याच.
विश्वास ठेवू नका, पोलिसांशी संपर्क साधा
हेरगिरी केल्याप्रकरणी तुम्हाला अटक होऊन कठोर कायदेशीर कारवाई होईल अशी भीती दाखवून ते नागरिकांना पैसे पाठविण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कोणी पोलीस असल्याची बतावणी करत घाबरवत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून शहानिशा करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.