फसवणुकीच्या पैशातून खरेदी करायचे डॉलर; 10 हजारांत विकायचे बँक खाते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टास्कच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. जेमीन टाडा आणि निमेश टाडा अशी त्या भावंडांची नावे आहेत. जिमेशच्या बँक खात्यात 22 लाख रुपये आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

कांदिवली येथे राहणारे सुकुमार याचा कॉम्प्युटर रिपेरिंगचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना एका नंबर वरून मेसेज आला. पार्ट टाइम नोकरी करणार का, अशी त्यांना विचारणा केली. त्यानंतर त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवली. व्हिडीओ लाईक आणि टास्कच्या नावाखाली त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यांना ठगाने 20 टास्क दिले. 20 पैकी 14 टास्क त्यांनी पूर्ण केले. ठगाने टास्कच्या नावाखाली त्यांच्याकडून 3 लाख 13 हजार रुपये उकळले. त्यानंतर आणखी टास्कच्या नावाखाली पैसे उकळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

परिमंडळ-11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाचा सूचना दिल्या. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार याच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक बाबासो पाटील, शामकुमार कापसे, आणि मच्छिंद्र सोनावणे याच्या पथकाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना बँक खात्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलीस सुरत येथे गेले. सुरत येथून पोलिसांनी जेमीन आणि निमेश या दोन भावंडांना अटक केली. फसवणुकीसाठी जेमीनने त्याचे खाते वापरण्यास दिले होते. त्या खात्यात आलेल्या पैशावरून निमेश हा डॉलर खरेदी करायचा. त्यानंतर ते डॉलर मुख्य सूत्रधाराला टेलिग्रामच्या माध्यमातून देत असायचा. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.

टेलिग्रामवर झाली ओळख
जेमीनचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याची मुख्य सूत्रधारासोबत टेलिग्रामवर ओळख झाली होती. ओळखीनंतर ती दोन्ही भावंडे गेल्या पाच महिन्यांपासून फसवणुकीचे पैशातून डॉलर खरेदी करत असायचे. तसेच या दोघांनी आतापर्यंत 12 बँक खाती ठगांना पुरवली आहे. निमेशच्या खात्यात आतापर्यंत 22 लाख रुपये आले होते. पोलिसांनी तपास करून काही बँक खाती फ्रिज केली आहे. त्या दोघांना पर बँक खात्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपये मिळत होते.