
खार लिंकिंग रोडवरील एका मॉलमध्ये नाईके, जॉर्डन या ब्रँडच्या नावाने बनावट शूज आणि चप्पलची सुरू असलेली विक्री सीबी कंट्रोलच्या पथकाने उधळून लावली. मॉलमधील दोन दुकानांवर छापा टाकून पोलिसांनी नऊ लाख किमतीचा बनावट शूज आणि चपलांचा मुद्देमाल जप्त केला.
खार येथील मॉलमधील दोन दुकानात नाईके आणि जॉर्डन ब्रँडच्या नावाने बनावट शूज आणि चपलांची विक्री करून नगरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची तक्रार सीबी कंट्रोलकडे आली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह उपनिरीक्षक रूपेश दरेकर, एकनाथ देसाई, तसेच गणेश डोईफोडे, भरत खारवी, संतोष पवार, रोहन शेंडगे, रवींद्र कुंभार, हिना राऊत, संगीता गिरी या पथकाने त्या दुकानांवर छापा टाकला. त्यावेळी दुकान मालक दिलशाद फारुख आणि अब्दुला खान हे दोघे नाईके आणि जॉर्डन ब्रॅण्डच्या नावाने बनावट शूज व चप्पल चढ्या किमतीत विकताना रंगेहाथ सापडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपी आणि नऊ लाखांचा बनावट शूज व चपलांचा मुद्देमाल खार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

























































