
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 15 शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे सुमारे साडेनऊ लाख रुपये न देता नवल रमणलाल बोरा हा व्यापारी पसार झाला आहे. बोरा यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आहे. सागर पवार यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
व्यापारी नवल रमणलाल बोरा याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात थेट शेतातून शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले. त्याच्या देयकापोटी त्याने मोठ्या रकमांसाठी धनादेश दिले. तर कमी रकमांसाठी साध्या कागदावर कच्च्या चिठ्या लिहून दिल्या. नवल बोरा व त्याची पत्नी सीमा बोरा यांच्या बँक खात्याचे हे धनादेश शेतकऱ्यांना देण्यात आले होते. बोरा यांनी दिलेले धनादेश शेतकऱ्यांनी बँकेत भरले. पण खात्यात पैसे नसल्यामुळे चेक परत आले.
पैसे मागितल्यावर शेतकऱ्यांचे त्याच्याशी वाद होऊ लागले. त्यांनंतर त्याने शेतकऱ्यांचे फोन उचलणे बंद केले. आठवड्यापासून बोरा याचा मोबाईल बंद आहे. त्यानंतर बोरा यांचा शहरातील वर्धमान सोसायटीत जाऊन शोध घेतला असता, त्याने ते घर आठवड्यापूर्वीच सोडल्याचे घरमालकाकडून सांगण्यात आले. त्याचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न थकल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वडाळा महादेव येथील सागर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करीत आहेत.
बोरा याने फसविलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून हळूहळू इतर गावतील शेतकरीही तक्रारीसाठी पुढे येतील, असे या शेतकऱ्यांनी सांगितले. बोरा याच्याकडून फसवले गेलेले शेतकरी असतील, तर त्यांनी श्रमिक शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बावके यांनी केले आहे. इतर गावातील शेतकऱ्यांचीही बोरा याने फसवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






























































