
‘‘प्रिय ग्राहक, आपले वीज कनेक्शन बिल भरलेले नाही. त्यामुळे आज रात्री तुमचे वीज कनेक्शन खंडित होणार आहे. कृपया दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा,’’ अशा प्रकारचे संदेश पाठवून नागरिकांना आर्थिक चुना लावणाऱया झारखंड येथील एका भामटय़ाच्या डी.बी. मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
दिनेश (नाव बदललेले) याचे येस बँकेत खाते असून तो लॅमिंग्टन रोड येथील एका दुकानात काम करतो. 1 ऑगस्ट रोजी दिनेश काम करतो त्या दुकानमालकाला त्याच्या मोबाईलमध्ये एक संदेश आला. ‘‘प्रिय ग्राहक, आपले वीज कनेक्शन बिल भरलेले नाही. त्यामुळे आज रात्री तुमचे वीज कनेक्शन खंडित होणार आहे. कृपया दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा,’’ असा तो संदेश होता.
मालकाच्या सांगण्यावरून दिनेशने त्या संदेशात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरून बोलणाऱयाने त्याचे नाव दीपक शर्मा असे सांगितले आणि बिलाचे पेमेंट अपडेट करण्यासाठी रस्ट डेक्स हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगून नेट बँकिगद्वारे 20 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार दिनेशने 20 रुपये पाठविले; पण त्याच्या मोबाईलवर एक लाख 20 रुपये डेबिट झाल्याचा संदेश आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिनेशने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे, उपनिरीक्षक अभिजीत देशमुख तसेच सचिन घुगे, सूरज धायगुडे, चैतराम पावरा या पथकाने तपास सुरू केला.
विविध बँक खात्यांत पैसे वळते करून धनादेशाद्वारे काढले
दिनेशच्या बँक खात्यातून वळते केलेले एक लाख विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले होते. त्यानंतर धनादेशाद्वारे ते पैसे विविध ठिकाणांहून काढण्यात आल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने अधिक तपशिलात जाऊन चौकशी करून मुकेश साहू या भामटय़ाला झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात जाऊन पकडले व ट्रान्झीट रिमांडवर मुंबईत आणले. आरोपीकडून विविध बँकांचे धनादेश, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
























































