
अनेकांना घरचे खाणे जितके आवडते, तितके स्ट्रीट फूडदेखील आवडते. म्हणूनच फास्ट फूडच्या व्यवसायाला मरण नाही. प्रत्येक शहराची स्ट्रीट फूड खासीयत असते. पंजाबच्या लुधियाना शहरात मिळणारा बर्गर असाच खास आहे. बर्गर म्हटलं की, साधारणपणे 30 ते 40 रुपयांपासूनही मिळतो. काही ठिकाणी महागडा बर्गरही असतो, पण लुधियानातील बर्गरची किंमत तब्बल 1000 रुपये आहे. ‘वेज गोल्ड बर्गर’ असे त्याचे नाव आहे. हा सोन्यासारखा किमतीचा बर्गर मोफत खायचा असेल तर एक खास ऑफरही देण्यात आली आहे.
लुधियानातील हा प्रसिद्ध बर्गर ‘बाबाजी बर्गरवाले’ यांच्याकडे मिळतो. हा बर्गर नेहमीच्या बर्गरपेक्षा वेगळा आहे. तो आकाराने मोठा असून त्यावर सोन्याचा वर्ख लावलेला आहे. सोन्याचा बर्गर खवैयांना मोफत खायला मिळेल, पण त्यासाठी फूड चॅलेंजची अट पूर्ण करावी लागेल. ही अट म्हणजे ग्राहकाला 5 मिनिटांत बर्गर संपवायचा आहे. तरच त्याला बर्गर फुकटात मिळणार आहे. बर्गरचे खाण्यासाठी घेतलेले पैसे परत दिले जातील. शिवाय एक हजार रुपयांचे बक्षीसही दिले जाईल. फूड ब्लॉगर ‘सही है’ या यूटय़ूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये शेफ बाबाजी हे बर्गर बनवत असून त्यांनीच ही भन्नाट ऑफर ठेवली आहे.
























































