
कोकणात जाणार्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स 30ऑगस्टपासून उपलब्ध होणार असून गणेशभक्तांनी जवळचे पोलीस ठाणे अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन स्टिकर्स घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
गणेशभक्तांसाठी पथकर माफीच्या निर्णयाबाबत अंमलबजावणी करण्याकरिता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी संबंधित अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, वाहतूक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
परतीच्या प्रवासातही सवलत
गणेशोत्सव काळात कोकणात जाणार्या भाविकांसाठी ही विशेष सवलत गणेशोत्सवासाठी जाताना आणि परतीच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे टोलमाफीच्या सवलतीसाठी स्टिकर्सचा नमुना तयार करण्यात आला असून त्यावर संबंधित वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकीत दिल्यावर हे स्टिकर्स उपलब्ध होतील.
गणेशभक्तांची गैरसोय नको
कोकणात जाणार्या गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी लक्षात घेता मुंबई-पुणे प्रवासात पुणे ते कोल्हापूर-कागलमार्गे कोकणात जाणार्या गणेशभक्तांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, किणी तासवडे, मुंबई प्रवेशद्वार, खेड-विसापूर येथील पथकर नाक्यांवर पथकरातून वाहनांना सवलत देण्यात येणार आहे. या काळात पथकर नाक्यांवर वाहतूककोंडी होऊ देऊ नका असे आदेश शिंदे यांनी यावेळी दिले.



























































