मित्रांसोबत यात्रेत गेल्यावर झाले भांडण, त्यानंतर तरुणाचा विहीरीत सापडला मृतदेह

राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याचे हाथपाय बांधले. नंतर त्याला मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. 15 मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत बुधवारी सकाळी लाकडी दांडे, चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाठ, गणेश लिपने आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाजेवर ठेवून विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव, वय 30 वर्षे, राहणार आरडगाव, बिरोबानगर, याचा असल्याचे निष्पन्न झाले.

विजय जाधव हा मंगळवारी दिनांक 14 मे 2024 रोजी कामावर गेला होता. त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला. यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले. त्यावेळी त्याच्या मित्रां पैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती. अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी विजय जाधव याचा हाथपाय बांधलेला मृतदेह, लाकडी दांडे व चप्पल विहिरीतील पाण्यात आढळून आले. विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. विजय जाधव याचा कोणत्या कारणाने व कोणी कोणी हत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय जाधव याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलं, सहा भाऊ असा मोठा परिवार आहे.