कल्पक आणि तंत्रशुद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहिणी निनावे,[email protected]

दिग्दर्शक चित्रपट, मालिका, नाटक… कोणतेही माध्यम दिग्दर्शकाच्या इशाऱयासरशी चालते… पाहूया हा दिग्दर्शकीय दृष्टिकोन कसा असतो… प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावेंसोबत… पहिले मान्यवर सतीश राजवाडे!

‘सामना’मधून फोन आला की, आम्ही एक नवीन सदर सुरू करतो आहोत. दिग्दर्शकांना भेटून त्यांचं मनोगत जाणून तुम्हाला त्यांना शब्दबद्ध करायचंय. मी आधी विचारात पडले, पण वाटलं, ही एक प्रकारची सुवर्णसंधीच आहे. आपल्या दिग्दर्शक मित्रांना भेटायची. प्रथम तरुण पिढीचे लोकप्रिय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना भेटायचं ठरवलं.

या क्षेत्रातली बहुतेक गुणी माणसं पार्ल्यात राहतात. तसंच सतीश राजवाडेही राहतो. शनिवारचा दिवस असल्याने ट्रफिक कमी असेल हा माझा गोड गैरसमज होता, पण पोहोचायला थोडा उशीरच झाला. काहीशी जुन्या पद्धतीची बिल्डिंग, खाली साईबाबांचं मंदिर आणि वर विचारे कुरियर सर्व्हिस. मनात एक मिश्कील विचारही आला की, बहुतेक बाबांसाठी कुणी गाऱहाणं टाकलं की, विचारे कुरियरवाले ते बाबांकडे पोहोचवत असतील. मनाशी प्रार्थना करत होते की, याच्या घरी कुत्रा नसावा, पण होताच. त्याला बिचाऱयाला मग आमचं बोलणं होईपर्यंत आत बंद राहावं लागलं.

गरमागरम चहा आणि उपम्यासोबत गप्पांना सुरुवात झाली. सतीशला म्हटलं, ‘‘सतीश, मलाही माहीत नाही तुझा या क्षेत्रातला प्रवास नेमका कसा सुरू झाला?’’ आणि मग नॉस्टॅल्जिक होत सतीश सांगायला लागला, ‘‘घरात वडिलांना चित्रपटाचं वेड होतं. तेव्हापासून चित्रपट या माध्यमाविषयी एक प्रकारचं कुतूहल मनामध्ये होतं. शाळेत असताना बालनाटय़ शिबिरात भाग घेतला आणि ही गोडी अधिकच वाढत गेली. मिठीबाई कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर या क्षेत्रात खऱया अर्थाने सुरुवात झाली. ‘टूरटूर’ आणि नंतर ‘ऑल द बेस्ट’ नाटकाच्या दुसऱया संचात काम करण्याची संधी मिळाली. हे नाटक पाहायला सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी आले होते. त्यांनी मला ‘संशोधन’ आणि ‘हजार चौरासी की मां’ या चित्रपटांत छोटय़ा भूमिका करण्याची संधी दिली.’’

गोविंद निहलानींना मी सांगितलं की, मला या क्षेत्राचं तंत्र शिकायचंय. ते म्हणाले, त्यासाठी तुला तिथे यावं लागेल. प्रत्यक्ष शिकावं लागेल काम कसं होतं ते. मग मी शिकण्यासाठी मन्सूर खान, बी. आर. चोप्रा यांच्या स्टुडिओमध्ये बसायला लागलो. अशातच एक म्युझिक व्हिडीओ मिळाला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.’’

मी म्हटलं ‘‘वा… मग पुढे?’’ सतीश म्हणाला, ‘‘…आणि मग एक चित्रपट करायला आला. मीच त्याची कथा लिहिली आणि आयुष्यातला चित्रपट दिग्दर्शनाचा पहिला स्वतंत्र प्रयत्न केला. तो म्हणजे चित्रपट ‘मृगजळ’! या चित्रपटाचं कौतुकही झालं आणि त्याला 23 पुरस्कार मिळाले.’’ मी म्हटलं, ‘‘वा वा… मग काय, तुझ्याकडे प्रोडय़ुसर्सची लाइन लागली असेल.’’ म्हणाला, ‘‘नाही गं, तुला माहीत असेलच, आपल्या क्षेत्रात काही भरवसा नसतो. चित्रपटाची चर्चा होऊनही काही काळ माझ्याकडे काहीच काम नव्हतं. अशावेळी ‘ऊनपाऊस’ ही स्मिता तळवलकरांची मालिका माझ्याकडे आली. मला घर चालवायचं होतं आणि स्मिताताई, संजय सूरकर यांच्यासोबत कामही करायचं होतं आणि मी ती मालिका स्वीकारली.’’

‘‘आज प्रचंड प्रमाणात मराठी सिनेमे येताहेत. वेगवेगळ्या विषयांवरचे. तू स्क्रिप्ट किंवा विषय निवडताना प्रामुख्याने कसला विचार करतोस?’’ सतीश म्हणाला, ‘‘एखाद्या चांगल्या विषयावर चित्रपट करावा असं प्रत्येकालाच वाटतं. माझाही तोच प्रयत्न असतो. आजच्या तारखेला कुणाला दुःख विकत घ्यायचं नाही. आपण जी कलाकृती करतो ती अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवी. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल, भावेल असा विषय मी निवडतो.’’
मी विचारलं, ‘‘काय रे, चित्रपट पूर्ण झाल्यावर तो पाहताना आणखी चांगला होऊ शकला असता असं कधी वाटतं का?’’ सतीश म्हणाला, ‘‘खरं सांगू? प्रत्येकच चित्रपटाच्या वेळी असं वाटतं. कारण त्या चित्रपटाच्या तांत्रिक बाजू पूर्ण करताना आपण अनेकदा त्या चित्रपटाची पारायणं करतो. मग वाटत राहतं, अरे असं करायला हवं होतं. कारण आपली क्रिएटिव्ह भूक सतत जागरूक असते.’’

मी म्हटलं, ‘‘ऍबसॉल्युटली… मग ही क्रिएटिव्ह भूक चित्रपट करताना भागते की मालिका? या दोन्ही माध्यमांच्या दिग्दर्शनात काय अंतर आहे असं वाटतं तुला?’’ सतीश म्हणाला, ‘‘तुला माहीत आहेच, खूप अंतर आहे. मालिका दिग्दर्शित करणं हे जास्त जिकरीचं आहे. मालिका करताना मर्यादित वेळेत अधिकाधिक फुटेज काढून द्यावं लागतं. म्हणजे क्वॉलिटी आणि क्वांटिटी दोन्हीचं भान ठेवावं लागतं. प्रेक्षकांच्या हाती रिमोट कंट्रोल आहे आणि असंख्य चॅनेल्स आहेत. तेव्हा त्यांना मालिकेमध्ये खिळवून ठेवणं आवश्यक असतं. शिवाय डेडलाइन असल्याने सगळ्या प्रॅक्टिकल अडचणींना तोंड देऊन शूटिंग करणं खूप कठीण असतं. हवा, पाणी, लोकेशन, कलाकारांची उपलब्धता या सगळ्यांचं भान ठेवावं लागतं. अर्थात चित्रपटातही वेळेचं बंधन असतं, पण इतकं नाही. क्रिप्टवर, टेकिंगवर विचार करून ठेवता येतो. चित्रपटाचा फायदा हा असतो की, बजेट वेगळं असतं. ‘लार्जर दॅन लाईफ’ विचार करता येतो, मांडता येतो.’’

मी म्हटलं, ‘‘अर्थातच गोष्ट प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर त्यांचं मनोरंजन करणं हेही महत्त्वाचं असतं.’’ सतीश म्हणाला आणि कलाकारांची अचूक निवड… त्यांच्याकडून काम करून घेणंही.’’ मी म्हटलं, ‘‘तू अभिनय पण करतोस आणि दिग्दर्शनही… मग दुसऱया दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करताना कसं वाटतं?’’ सतीश म्हणाला, ‘‘मी जेव्हा अभिनेता असतो, तेव्हा मी माझं डोकं चालवत नाही. कारण माझा त्या दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास असतो. मला लुडबूड करायला आवडत नाही. ही गोष्ट मी काही ज्येष्ठ दिग्दर्शकांकडूनच शिकलो आहे.’’

सतीशने नुकतीच नवीन जबाबदारीही घेतली आहे. म्हणून मी विचारलं, ‘‘नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीच्या कन्टेन्ट हेड पदाची नवीन जबाबदारी तुझ्यावर सोपवण्यात आली आहे. मग याबरोबरच तू अभिनय, दिग्दर्शन दोन्ही चालू ठेवणार की तूर्तास ब्रेक घेणार आहेस?’’ सतीश म्हणाला, ‘‘सध्या माझं नाटक चालू आहे. ‘ए परफेक्ट मर्डर’. त्याचे प्रयोग चालू आहेत. ही नवीन जबाबदारीही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.’’

मी म्हटलं, ‘‘सतीश, हल्ली शॉर्ट फिल्म, नेटफ्लिक्स वगैरे खूप बघताहेत लोक. मग याचा इतर ऍप्सवरच्या कार्यक्रमांमुळे मराठी मालिकांवर परिणाम होईल अस वाटतं तुला?’’ सतीश म्हणाला, ‘‘काही काळाने होऊ शकतो. कारण विषयांचं वैविध्य, मर्यादित काळात संपणारी मालिका, जगात काय चाललं आहे हे सांगणारा आशय यामुळे प्रेक्षकांना ती पाहावीशी वाटणार. शिवाय ती तुम्ही मोबाईलवरही पाहू शकता. तेव्हाही स्पर्धा निर्माण झाली आहेच. फक्त टेलिव्हिजन पाहणारा जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग टेक्नोसॅव्ही झाल्यानंतर. त्यासाठी वेळीच सावध होऊन मालिकांमध्ये विषयात वैविध्य आणण्याची गरज आहे.’’

मी विचारलं, ‘‘मग तुझी इच्छा आहे का या ऍप्सवरच्या मालिका करण्याची?’’ सतीश म्हणाला, ‘‘हो, मीसुद्धा अशा तऱहेचे काम करायला उत्सुक आहे आणि करणारही आहे.’’ आमचं हे सगळं बोलणं चालू असतानाच आतमध्ये पल्लवीची धावपळ चालू होती. कामं चालू होती. मी हसत विचारलं, ‘‘मग तुमच्या घरामध्ये दिग्दर्शन कुणाच चालतं?’’ सतीश लगेच म्हणाला, ‘‘अर्थात बायकोचं, पल्लवीचं. तिने माझ्या बऱयावाईट काळात माझी पूर्ण साथ दिली आहे. मी बाहेर स्ट्रगल करत असताना घराची जबाबदारी निभावली आहे.’’

सतीश मला नेहमीच काहीसा गंभीर, मितभाषी, फोकस्ड आणि टू द पॉइंट बोलणारा वाटतो. तसंच तो बोलला. त्याचं हे फोकस्ड असणंच त्याच्या यशाचं गमक असणार. यापुढेही सतीश राजवाडे हा इंडस्ट्रीमध्ये अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा उमटवणारा दिग्दर्शक चांगल्या कलाकृती देईल यात शंका नाही.