हिंदुस्थानची वाघीण पुन्हा आखाडय़ात, अधुरे ऑलिम्पिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनेश फोगाटचे निवृत्तीवर पूर्णविराम

पॅरिस ऑलिम्पिक गाजवणारी हिंदुस्थानची वाघीण मेहनती कुस्तीपटू विनेश फोगाटने आपले अधुरे ऑलिम्पिक स्वप्न पूर्ण आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर पूर्णविराम लावला आहे. तिने आज आपल्या कुस्तीच्या आखाडय़ातील पुनरागमनाची घोषणा सोशल मीडियावर एका भावुक पोस्टद्वारे केली.

2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही विनेशला पदक मिळाले नव्हते. वजन 100 ग्रॅम जास्त निघाल्याने ती अंतिम फेरीच्या काही तास आधीच स्पर्धेबाहेर झाली होती. या घटनेने ती मानसिकदृष्टय़ा खचली आणि भावनेच्या भरात तडकाफडकी कुस्तीला रामराम ठोकला होता. त्यानंतर ती राजकारणाकडे वळली आणि आमदारही झाली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश अंतिम फेरी गाठणारी पहिली हिंदुस्थानी महिला पैलवान ठरली होती. तिच्या खेळात त्यावेळी असा आत्मविश्वास होता की, तिचे सुवर्णपदक जवळपास निश्चित मानले जात होते. पण तिच्या वजनात किरकोळ फरक निघाल्याने ती तत्काळ अपात्र ठरली आणि तिच्या स्वप्नांचा प्रवास अचानक संपला.

आता मी एकटी नाही…

याच वर्षी विनेश फोगाट आई झाली. मुलाला जन्म दिल्यानंतर विनेश आता मातृत्वासह खेळाडूची जबाबदारीही सांभाळणार आहे. ती म्हणते, ‘शिस्त, सराव, लढाई हे माझ्या रक्तात आहे. मी कितीही दूर गेले तरी माझा एक भाग नेहमीच मॅटवर राहिलाय. यंदा मी एकटी नाही. माझा मुलगाही माझ्या टीमचा भाग आहे. तो माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे,’ असेही आई विनेश म्हणाली.

18 महिन्यांचे मौन, विचार आणि पुनर्जन्म

इन्स्टाग्रामवरील भावुक पोस्टमध्ये विनेशने कबूल केले की, गेल्या दीड वर्षात तिने स्वतःला अनेक प्रश्न विचारले. तिला खेळापासून, दबावापासून आणि अपेक्षांपासून दूर जाण्याची गरज होती. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘पॅरिस शेवट होता का? मलादेखील उत्तर नव्हते, पण त्या शांततेत मला जाणवलं की, माझ्या आतली आग आजही विझलेली नाही. ती कधीच विझली नव्हती. खेळापासून दूर राहून स्वतःचा प्रवास, त्यातील चढउतार आणि त्याग समजून घेतले आणि त्यातून पुन्हा लढण्याची ताकद मिळाली.’