फूड लेबलिंगवर ‘100 टक्के’ शब्द नको!

देशातील अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) खाद्य उत्पादनांच्या लेबलिंगवर ‘100 टक्के’ हा शब्द वापरण्याविरुद्ध कडक सूचना केल्या आहेत. ‘100 टक्के’मधून ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असे एफएसएसएआयने म्हटले. सर्व फूड बिझनेस ऑपरेटर्सनी अन्न लेबल्स, पॅकेजिंग सामग्री आणि प्रचारात्मक सामग्रीवर या शब्दाचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेय. यासंदर्भात एफएसएसएआयने सूचना जारी केल्या आहेत, त्यानुसार खाद्य उत्पादनांच्या लेबलिंगवर ‘100 टक्के’ लिहिण्याचे प्रमाण वाढल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. सध्याच्या नियमांमध्ये हा शब्द येत नाही. तसेच ग्राहकांची फसवणूक करणारा आहे. अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) नियमावली 2018 नुसार, ‘100 टक्के’ ही संज्ञा एफएसएस कायदा, 2006 नियम आणि विनियमांनुसार कोणत्याही प्रकारे परिभाषित किंवा संदर्भित केलेली नाही.