पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाला लाठीने तारले, सराईताकडून पोलिस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला

पुणे शहरातील गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार्‍याला पकडण्यासाठी गेलेल्या फरासखाना ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर सराईत तडीपार गुन्हेगाराने कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपनिरीक्षकाने लाठीवर कोयत्याचा वार झेलून जीव वाचविला. त्याचवेळी दुसर्‍या आरोपीने पोलिसांवर विट फेकून जखमी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेत घडली.

प्रतिक पृथ्वीराज कांबळे असे फरार झालेल्या सराईत तडीपाराचे नाव आहे.  त्याचा साथीदार कुमार भागवत चव्हाण (दोघेही रा. मंगळवार पेठ) याला  पोलिसांनी अटक केली आहे. नरेश केशव वाडेवाले (पोलीस उपनिरीक्षक) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बहुतांश पोलीस ठाण्याच्या हद्दीत  पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दोन दिवसांपुर्वी मंगळवार पेठेतील संबंधित सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले कर्मचार्‍यासह रविवारी संध्याकाळी पाच वाजता मंगळवार पेठेत आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी  तेथे आलेल्या तडीपार सराईत आरोपी प्रतिकने पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांच्यासह कर्मचार्‍याला शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

नरेश यांनी कोयत्याचा वार लाठीवर झेलून प्रतिकच्या हातातील कोयता ताब्यात घेतला. त्यानंतर रिक्षात बसलेला दुसरा आरोपी कुमारने वीट फेकून अधिकार्‍यासह कर्मचार्‍याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर तडीपार सराईत प्रतिक कांबळे पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक मागावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या