लॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार

3815
shivsena-logo-new

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या या संकटकाळात बेळगाव येथील उद्योजक रामशीश देवनंदन शाह यांचा पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे अंत्यसंस्कार पुण्यात करावे की बेळगावला या विवंचनेत अडकलेल्या मुलाच्या मदतीला शिवसैनिक धावले. पुण्यातील सैनिकांनी मदत केल्याने मृतदेह बेळगावला नेण्यात आला आणि तेथे रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करता आले.

उद्योजक रामशीश शाह यांचा मुलगा नोकरीनिमित्त हिंजवाडी येथे राहतो. मुलाकडे आले असता शाह यांचा सोमवारी न्यूमोनियाने मृत्यू झाला. मृतदेह बेळगावला कसा न्यायचा या चिंतेत मुलगा आणि आई होती. कारण लॉकडाऊनमुळे नातेवाईक, आणि मित्र पुण्याला येऊ शकत नव्हते. तसेच मृतदेह बेळगावला नेणे अवघड झाले होते. या विवंचनेत असताना शाह यांच्या मुलाने शिवसैनिक अरुण गावडे यांना फोन लावला आणि आपली अडचण सांगितली. गावडे आणि शाह यांच्या नातेवाईकांनी अनेकांशी संपर्क साधला, मात्र संचारबंदीमुळे सर्वांनी हात वर केला.

ही बाब बेळगाव सीमाभाग शिवसेना संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांना समजताच त्यांनी मुंबई येथे शिवसेना भवनात संपर्क साधला. त्यानंतर पुणे येथील नगरसेवक प्रमोद भानगिरे यांना मदत करण्यास सांगण्यात आले. त्यांनी ससून रुग्णालयात जाऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आणि राष्ट्रीय महामार्गावर कोणीही अडवू नये यासाठी पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे अखेर मृतदेह बेळगाव येथे नेण्यात आला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शाह आणि गुजराती समाजाने शिवसेनेचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या