सामना प्रतिनिधी । जळकोट
पाटोदा (बु.) ता. जळकोट येथील रहिवाशी व भारतीय सैन्यदलातील जवान विजयकुमार विश्वनाथ ढगे यांच्या पार्थिवावर त्यांच्या पाटोदा (बु.) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जळकोट तालुका व परिसरातून मोठा जनसमुदाय त्यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित होता.
सैन्य दलाकडून हवेत फैरी झाडून विजयकुमार ढगे यांना मानवंदना देण्यात आली. पाटोदा (बु.) येथील रहिवाशी व सैनिक विजयकुमार ढगे हे दीपावळी संपवून फिरोजपुर (पंजाब) येथे कर्तव्यावर रुजू होण्यासाठी जात असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व 10 नोव्हेंबर रोजी त्यांचे जागीच निधन झाले होते. त्यांचा मृतदेह पंजाब येथून हैद्राबादला विमानाने आणण्यात आला व तेथून शासकीय मोटारीने मृतदेह पाटोदा गावात येऊन पोहोचताच त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी हंबरडाच फोडला. सेवानिवृत्तीसाठी केवळ सात महिने शिल्लक असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. पाटोदा (बु.) येथील ज्ञानविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 13 रोजी अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थीव देह ठेवण्यात आला होता. जळकोट तालुक्यातील हजारो लोकांनी आपल्या लाडक्या सुपुत्राचे दर्शन घेतले.’विजयकुमार ढगे अमर रहे’ च्या गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी आमदार सुधाकर भालेराव यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार डी.एच. दंताळे, माजी आमदार गोविंद केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बनसोडे, बाजार समितीचे सभापती मन्मथ किडे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, अॅड. नरेश सोनवणे, खादर लाटवाले, राजेंद्र केंद्रे, जळकोटचे नगरसेवक शिवानंद देशमुख, मच्छींद्र कामत, सरपंच जयमाला गुट्टे, उपसरपंच सत्यवान पांडे, पंचायत समितीचे सभापती व्यंकटराव केंद्रे, गटविकास अधिकारी जे.डी. गोरे, संचालक धर्मपाल देवशेट्टे, सरपंच महेताब बेग, शिरीष चव्हाण, बाबुराव गुट्टे, मारुती पांडे, दयानंद दाडगे, बालाजी गुट्टे, आदी प्रमुखांसह हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते.
त्यांचा चार वर्षाचा मुलगा मयुर याने वडिलांना मुखाग्नी दिला. यावेळी अनेक मान्यवरांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करून श्रद्धाजंली अर्पण केली.





























































