जी – 7 परिषद : मोदी-ट्रम्प यांच्यात कश्मीर मुद्द्यावर चर्चा?

641

कश्मीर खोर्‍यातून 370 कलम हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी प्रथमच आंतरराष्ट्रीय मंचावर आले आहेत. फ्रान्समध्ये होणार्‍या जी-7 देशांच्या वार्षिक शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी मोदी आज फ्रान्सला पोहोचले. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जपान या सात देशांच्या बैठकीत हिंदुस्थानलाडॉयलॉग पार्टनरम्हणून विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींना भेटणार आहेत. त्यांच्या या चर्चेत कश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जी-7 देशांच्या शिखर परिषदेत यावेळी जागतिक मंदी, काही देशांमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध, ऍमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग, ब्रेक्झिट असे काही विषय चर्चिले जाणार असल्याने जगाचे लक्ष अटलांटिक महासागराच्या किनारी असलेल्या बिआरित्झ या शहरात होणार्‍या या परिषदेकडे लागले आहे. परिषदेच्या काही तास आधीच फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युन्युअल मॅक्रॉन यांनी या परिषदेबाबत जनतेशी बोलताना म्हटले की, ऍमेझॉनमध्ये लागलेल्या आगीचा विषय या बैठकीत सर्वात पहिला घेतला जाणार आहे. दरम्यान, युरोपियन संघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी म्हटले की, व्यापार युद्धामुळे जगात मंदी आणखी वाढेल, पण व्यापार समझोता झाल्यास सर्वच अर्थव्यवस्थांना बळ मिळेल.

मोदी आणि ट्रम्प भेट

कश्मीर प्रश्न हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष देण्याची गरज नाही, असे हिंदुस्थानने वारंवार ठणकावून सांगितलेले असतानाही अमेरिकेने या विषयात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जी-7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार आहे. यात कश्मीर खोर्‍याचा विषय निघण्याचीही दाट शक्यता आहे.

चीनअमेरिकेत व्यापार युद्ध

जगात बडे राष्ट्र असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनशी असलेले आपले व्यापार युद्ध आणखी भडकेल असे वक्तव्य शुक्रवारीच केले आहे. चीनमधून अमेरिकेत येणार्‍या 75 अब्ज डॉलर्सच्या सामानावरील आयात शुल्क अमेरिकेने 5 टक्क्यांनी आणखी वाढवले आहे. ‘‘चीनच्या वस्तूंची आम्हाला गरज नाही, आम्ही चीनशिवायही चांगले राहू शकतो’’ असे स्फोटक विधानही ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळे चीनअमेरिका यांच्यात व्यापार युद्ध आणखी भडकणार हे सरळ आहे. याचे पडसाद जी-7 शिखर परिषदेत नक्की उमटतील अशी शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या