गडनदीवरील येगांव – कुंभारखाणी पूल बनला धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील दोन्ही गावांना जोडणारा गडनदीवरील येगांव – कुंभारखाणी बुद्रुक पूल धोकादायक बनला असून या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. 22 जुलै 2021 च्या अतिवृष्टीने या पुलाची मोठी झीज झाली असून पुलाचा स्लॅब कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलाची नव्याने निर्मीती करणे आवश्यक असल्याची बाब संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तर गडनदीवरील येगांव – कुंभारखाणी पूल मंजूर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी आणि चिपळूण तालुक्यातील येगांव आणि इतर गावांना जोडणाऱ्या गडनदीवरील येगांव पुलाची लांबी 50 मीटर आहे तर पुलाच्या 4 खांबांची उंची 9.10 मीटर आहे या पुलाच्या दोन्ही बाजूकडील उंची प्रत्येकी 5.30 मीटर व 8 मिटर आहे. 6 खांबांवर उभ्या असलेल्या या पुलाची स्थिती सध्या धोकादायक बनली असून याबाबत संतोष येडगे यांनी चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळ्ये यांच्या सोबत चर्चा करुन या पुलाला प्राधान्याने मंजुरी घेण्याची विनंती केली आहे.

यै पुलाची लांबी आणि उंची याचा विचार करता या कामासाठी साधारण 6 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याप्रकरणी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत व चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम हे दोन्ही लोकप्रतिनिधी सकारात्मक असून या पुलाच्या निर्मीतीसाठी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता यांना पुलाच्या निर्मीतीसाठी शिफारस पत्र दिले आहे. एकाच वेळी एका कामासाठी खासदार आणि आमदार अशा दोन लोकप्रतिनिधींचे शिफारस पत्र जोडणे ही कामाची सकारात्मक बाजू असल्याचे येडगे यांनी सांगितले खासदार विनायक राऊत आणि आमदार शेखर निकम यांच्या शिफारशीनुसार आणि आमच्या प्रभावी मागणीनुसार या पुलाची निर्मिती शक्य असल्याचे येडगे यांनी सांगितले आहे.