
प्रसिद्ध उद्योजक संतोष शिंदे, त्यांची पत्नी व मुलाच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी गडहिंग्लजच्या माजी नगरसेविका आणि अमरावती येथील पोलीस अधिकाऱयाला अटक केली. रविवारी रात्री उशिरा कर्नाटकातील विजापूर येथून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, या दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
माजी नगरसेविका शुभदा पाटील (रा. गिजवणे रोड, गडहिंग्लज) आणि अमरावती येथे कार्यरत असणारे पोलीस अधिकारी राहुल राऊत (रा. निलजी, ता. गडहिंग्लज) यांना अटक केली आहे.
गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी शुक्रवारी रात्री घरात पत्नी-मुलासह आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी संतोष यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणाऱया चौघांच्या नावे लिहिली होती.
माजी नगरसेविका शुभदा पाटील व पोलीस अधिकारी राहुल राऊत यांनी बलात्काराच्या खोटय़ा गुह्यात अडकवून त्यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच पुणे येथील विशाल बाणेकर व संकेत पाटे या दोघांनी साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तणावातून उद्योजक संतोष शिंदे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद गडहिंग्लज पोलिसांत दाखल झाली होती. याप्रकरणी या चौघांवरही गुन्हा दाखल झाला होता.
यातील माजी नगरसेविका शुभदा पाटील व पोलीस अधिकारी राहुल राऊत या दोघांना पोलिसांनी रविवारी रात्री कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पुणे येथील अन्य दोघा संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन सरगर करीत आहेत.
संशयित आरोपींवर कठोर कारवाई करा – विजय देवणे
संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आज पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, निरीक्षक गजानन सरगर यांची भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी गडहिंग्लज शहरप्रमुख संतोष चिकोडे, रियाजभाई शमनजी उपस्थित होते. दरम्यान, देवणे यांनी संतोष शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देत संतोष यांच्या आई व बहिणीचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला.
न्यायालयाबाहेर नागरिकांची गर्दी
उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील संशयितांना न्यायालयात आणल्याची माहिती मिळताच न्यायालयाबाहेर नागरिकांनी गर्दी केली. आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, यासाठी नागरिकांनी घोषणाबाजी केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी नागरिकांसोबत चर्चा करून समजूत काढल्यानंतर नागरिक शांत झाले.
































































