देशाच्या ‘विकासात’ रिझर्व्ह बँकेचा खोडा; गडकरींचीही वादात उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद पेटलेला असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. देशभरातील पायाभूत विकास प्रकल्पांसाठी बँकांनी पैसे देण्यास नकार दिला असून पैसे मिळण्यात रिझर्व्ह बँकेनेच खोडा घातल्याचा आरोप गडकरींनी केला आहे.

रिझर्व्ह बँकेकडील तब्बल 3 लाख 60 हजार कोटींच्या राखीव निधीवर मोदी सरकारला डल्ला मारायचा आहे. आगामी निवडणुकांमध्ये आश्वासने देण्यासाठी सरकारला हे पैसे हवे आहेत, मात्र बँकेने त्यास स्पष्ट नकार दिल्याने वाद पेटला आहे. उद्या सोमवारी याच मुद्दय़ावर रिझर्व्ह बँकेच्या नियामक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत असून सरकारवर नाराज गव्हर्नर उर्जित पटेल या बैठकीतच राजीनामा देण्याची शक्यता आहे.

दोन लाख कोटी रुपये

नितीन गडकरी यांनी आता रिझर्व्ह बँकेवर हल्ला केला आहे. पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने देशभरातील बँकांकडे दोन लाख कोटी रुपयांची मागणी केली, पण रिझर्व्ह बँकेने त्यात खोडा घातल्याने या बँकांनी निधी देण्यास नकार दिला आहे. एकूण दीडशे प्रकल्प अडचणीत आले असून गुंतवणूकदारांना बँका कर्जच देत नसल्याचा आरोप गडकरींनी केला. रिझर्व्ह बँकेचे परिपत्रकच याला जबाबदार असल्याचे गडकरींचे म्हणणे आहे.

गडकरी म्हणाले, जेव्हा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारला तेव्हा 403 प्रकल्प होते. त्यात 3.85 लाख कोटींची गुंतवणूक झाली होती. मी ते प्रकल्प वेळेत पूर्ण करून बँकांचे तीन लाख कोटी रुपये  वाचवले आहेत.

पटेलांना भेटण्याची इच्छा नाही

गडकरी उर्जित पटेल यांच्यावर भडकले आहेत. परिपत्रकाबाबत गव्हर्नर उर्जित पटेल यांना भेटणार का? असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, यावर मार्ग काढण्याचे त्यांचे काम नाही आणि पटेल यांच्या भेटीचा आतापर्यंतचा अनुभव वाईटच आहे. त्यामुळे त्यांना भेटण्याची मला बिलकूल इच्छा नाही. कुणापासून फायदा होणार असेल किंवा काम होणार असेल तरच त्याला भेटावे असे माझे मत आहे. उर्जित पटेल यांना भेटण्यात काहीच अर्थ नाही.