आशियाचा स्थापत्य वारसा – श्रीलंकेतील पोलोन्नरुवा आणि गलपोथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंकेची आजची वाटचाल अतिशय दुर्दैवी असली आणि अराजकाची असली तरी प्राचीन काळी या देशाने अतिशय वैभवशाली दिवस पाहिले आहेत. पराक्रमी राजे, समृद्ध अर्थव्यवस्था, उत्तम स्थापत्य, भव्य शिल्पाकृती या सर्वांनी श्रीलंकेचा ऐतिहासिक काळ उज्ज्वल केला होता. राजा पराक्रमबाहू (1ला) आणि निस्संकमल्ल (1ला) यांनी विस्तारलेले हे श्रीलंकेचे राज्य आणि त्यांची पोलोन्नरुवा ही राजधानी त्या देशाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वपूर्ण स्मृती आहे.

श्रीलंकेची आजची वाटचाल अतिशय दुर्दैवी असली आणि अराजकाची असली तरी प्राचीन काळी या देशाने अतिशय वैभवशाली दिवस पाहिले आहेत. पराक्रमी राजे, समृद्ध अर्थव्यवस्था, उत्तम स्थापत्य, भव्य शिल्पाकृती या सर्वांनी श्रीलंकेचा ऐतिहासिक काळ उज्ज्वल केला होता. यामध्ये इ.स.च्या 11 व्या शतकानंतरचे काही राजे हे फार महत्त्वाचे ठरतात. पूर्वी या देशातील अनुराधपूर आणि डम्बुल्ल यांची माहिती पाहताना आपण हिंदुस्थानातील राजांचे आणि श्रीलंकेचे संबंध पाहिले होते. त्या वेळेस चोल राजा राजेंद्र -1 याने त्याची राजधानी अनुराधपूरहून हलवून पोलोन्नरुवा येथे नेली. त्या वेळेस तिचे नाव बदलले आणि जनंतमंगलम असे ठेवले, पण स्थानिक तामीळ शिलालेखीय पुराव्यांमधून या स्थळाचे नाव पुलैनरी असे येते. अभ्यासकांच्या मते ते पुलस्त्य नगर किंवा पुलत्ती नकरम म्हणजे हिंदू ऋषी पुलस्त्य यांची नागरी याचा अपभ्रंश आहे. पुढे या स्थळाचे नाव विजयराजपुरम् असे ठेवले होते हे जयबाहू (1ला ) याच्या लेखातून लक्षात येते. त्याचा भाऊ विजयबाहू (1ला) हा पराक्रमी राजा होता आणि त्याच्या नावावरून हे नाव आले असावे, असे वाटते. आजचे पोलोन्नरुवा हे नाव जेम्स इमर्सन टेनेंट याने दिले होते.

पोलोन्नरुवा परिसरातील चोलांचे राज्य विजयबाहू (1ला) याने इ.स. 1070 नंतर संपवले. त्याने मोठय़ा प्रमाणात राज्यविस्तारही केला. त्याचा नातू आणि सुप्रसिद्ध राजा पराक्रमबाहू (1ला) (इ.स. 1153-1186) याच्या काळात तर पोलोन्नरुवाचे राज्य अत्यंत भरभराटीला आले. केवळ श्रीलंकेतच नाही तर देशाच्या बाहेरच्या प्रदेशातही जाऊन पराक्रमबाहू (1 ला) याने त्याचा राज्यविस्तार केलेला होता. या काळात पोलोन्नरुवा राज्य हे एक स्वयंपूर्ण राज्य म्हणून उदयाला आले होते. या राजाने राज्यातील सुबत्तेसाठी पाणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे ओळखले होते. त्यामुळे ‘स्वर्गातून पडणाऱया पाण्याचा एकही थेंब वाया घालवायचा नाही, त्याचा वापर करून झाल्यावरच ते पाणी समुद्राला मिळाले पाहिजे’ असा त्याने निश्चय केला होता. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सिंचनाची कामे त्याने राज्यात पूर्ण केली. त्याचा परिणाम म्हणून त्याच्या काळात व्यापार आणि शेतीची भरभराट झाली. पूर्वीच्या राजांनी बांधलेली धरणे, तलाव त्याने आकाराने मोठे केले, त्यांची दुरुस्ती केली . त्यांच्या आसपासची जंगले आणि झाडी साफ करून ती जमीन शेतीसाठी वापरायला सुरुवात केली. त्याने स्वतः खूप मोठे तलाव बांधले. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय म्हणजे पराक्रमसागर किंवा पराक्रमसमुद्र नावाचा अतिप्रचंड जलाशय. खरे तर तलावासारख्या जलाशयाला समुद्र असे नाव दिले गेले कारण त्याचा आकार अतिशय मोठा आहे आणि भरतीच्या वेळेस जशा लाटा समुद्रामध्ये येतात तशाच वाऱयामुळे या जलाशयातसुद्धा येतात. त्या जलाशयात असलेल्या बेटावर त्याने एक राजवाडा आणि एक स्तूप बांधला.

अशा या पराक्रमबाहू (1ला) याचा काळ म्हणजे श्रीलंकेचे सुवर्णयुगच होते असे म्हणायला हरकत नाही. त्याने फक्त लोकोपयोगी कामेच केली असे नाही तर देशातील बौद्ध धर्माची तत्कालीन परिस्थिती पाहून त्यातही सुधारणा करायला सुरुवात केली. अनेक बौद्ध भिख्खू त्या वेळेस विवाह करून उपासकांसारखे जीवन जगत होते. संघाचे तीन मोठे भाग झाले होते. बौद्ध तिपिटकांमधील विनय पिटक या ग्रंथावर विलक्षण प्रभुत्व असलेल्या महाथेर कस्सप याच्या मार्गदर्शनाखाली त्याने या धर्मातील सुधारणा करायला सुरुवात केली. आधी त्याला प्रचंड विरोध झाला. पण त्याला न जुमानता त्याने धर्मातील सर्व अनिष्ट, प्रक्षिप्त चालीरिती काढून टाकल्या. काही भिख्खू देश सोडून निघून गेले तर काहींनी गृहस्थाश्रम स्वीकारला. राजाने थेरवादी परंपरा पुनर्प्रस्थापित केल्या. संघासाठी मोठय़ा प्रमाणात विहारांचे बांधकाम केले. या काळात श्रीलंकेमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर स्थापत्यनिर्मिती झाली. आज श्रीलंकेतील स्थापत्याचा इतिहास पाहायचा झाला तर तो अर्धा अधिक पराक्रमबाहू (1ला) याच्या काळातील स्थापत्याचाच दिसतो. त्यामुळेच पोलोन्नरुवा हे युनेस्कोने 1982 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

पराक्रमबाहू (1ला) याने अनुराधपूर आणि परिसरातील जुन्या स्थापत्याची दुरुस्ती केली. बुद्धाचा दात तेथून पोलोन्नरुवा येथे आणला आणि तिथे एक मोठा स्तूप आणि खास श्रीलंकेतील स्थापत्याचे वैशिष्टय़ असलेले वटदागे (स्तूपाभोवती बांधलेली एक संरक्षणाची भिंत) बांधून त्यात तो संरक्षित केला. काही अभ्यासकांच्या मते पोलोन्नरुवा येथील वटदागे हा निस्संकमल्ल या राजाच्या काळात बांधला गेला. काहींच्या मते त्यात बुद्धाचे भिक्षापात्र होते. काहीही असले तरी त्या काळातील श्रीलंकेतील सर्वात महत्त्वाचे स्थापत्य म्हणून याची नोंद केली पाहिजे. पोलोन्नरुवा येथे पराक्रमबाहू (1ला ) याने मोठय़ा प्रमाणावर इमारती बांधल्या. त्यामध्ये राजवाडा, नगरच्या भोवती संरक्षक भिंत, दवाखाने, इस्पितळ, स्नानगृहे, उद्याने, तलाव, गल विहार नावाचे भिक्षूगृह, लंकातिलक मंदिर इ. यापैकी अनेक इमारतींचे अवशेष या परिसरात आजही पाहायला मिळतात. तसेच इथे अनेक विशाल पुतळे प्रस्तरात कोरले आहेत. त्यामध्ये गौतम बुद्धाचे तर आहेतच, पण खुद्द पराक्रमबाहू (1ला) याचाच आहे असे मानले जाते. काही अभ्यासकांच्या मते तो अगस्त्य किंवा पुलस्त्य ऋषींचा असू शकतो.

महावंस या ग्रंथात दिलेल्या परंपरेनुसार इ.स. पूर्व 6व्या शतकात राजकुमार विजय आपल्या 700 लोकांना घेऊन वंगदेशातून श्रीलंकेत आला, हे आपण पूर्वीच्या लेखात पहिले होते. याच विजयाच्या वंशातील राजा निस्संकमल्ल (1ला) हा पराक्रमबाहू (1ला) याचा जावई होता. त्याने त्याच्या सासऱयानंतर काही राजकीय घडामोडीत भाग घेतला आणि काही काळाने या पोलोन्नरुवा राज्याची धुरा सांभाळली. त्यानेही याच परिसरात मोठय़ा प्रमाणात कला आणि स्थापत्याची निर्मिती केली. हा राजा बौद्ध होता आणि त्याने असे जाहीर केले होते की फक्त बौद्ध धर्मीय व्यक्तीच श्रीलंकेच्या गादीवर बसायला लायक असू शकते.

राजा निस्संकमल्ल (1ला) याने आपले कर्तृत्व अनेक शिलालेखांमधून अजरामर करून ठेवलेले दिसते. डम्बुल्ल येथील लेण्यात त्याचा एक लेख आहे तसेच त्याने पोलोन्नरुवा येथे एका खूप मोठय़ा शिळेवर एक मोठा लेख लिहिला आहे. मिहिंतले येथून त्याच्या सेवकांनी ही 8.2 मीटर लांब आणि 1.4 मीटर रुंद अशी शिळा इथे आणली. ती एका मोठय़ा प्रस्तरावर पक्की बसवली आहे. त्यावर 72 ओळींचा शिलालेख लिहिलेला आहे. तो मध्ययुगीन सिंहल लिपी आणि मध्ययुगीन सिंहाल आणि संस्कृत अशा मिश्र भाषेत लिहिला आहे.असे मानले जाते की राजाने त्यावेळेस धातू वितळवून या अक्षरांमध्ये ओतला होता. त्यामुळे ती अक्षरे जास्त स्पष्ट झाली आणि त्यांचे जतनही झाले. त्यामध्ये राजा कसा राज्य करायला अतिशय योग्य आहे असे त्याचे वर्णन केले आहे. त्याची वंशावळ आणि त्याचे कार्य याची माहिती, तसेच ही शिळा कोठून आणि कशी आणली याचीही माहिती दिली आहे. या शिळेच्या खालच्या भागात हंस पक्षी दोन रंगांमध्ये दाखवले आहेत तर एका बाजूला हातात कमळ घेऊन बसलेल्या लक्ष्मीवर हत्ती अभिषेक करत आहेत असे शिल्पही कोरले आहे. सिंहली भाषेत ‘गल’ म्हणजे दगड आणि ‘पोथा’ म्हणजे पुस्तक. स्थानिक लोक या शिलालेखाला ‘गल पोथा’ म्हणजे दगडी पुस्तक असे म्हणतात. आता त्याचे हेच नाव रूढ झाले आहे. अशा प्रकारे राजा पराक्रमबाहू (1ल) आणि निस्संकमल्ल (1ला) यांनी विस्तारलेले हे श्रीलंकेचे राज्य आणि त्यांची पोलोन्नरुवा ही राजधानी त्या देशाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वपूर्ण स्मृती आहे यात शंका नाही. ते इतिहासातील भाग्याचे दिवस आता परत कधी पाहायला मिळतील असा विचार आजचे श्रीलंकेतील लोक नक्की करत असतील.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)