
सामना ऑनलाईन । मुंबई
गंधेकर इलेक्ट्रिकल्स संघाने दादर येथे सुरू असलेल्या शिवनेरी मंडळाच्या सुवर्ण महोत्सव कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवून आगेकूच केली. प्रथम श्रेणीच्या व्यावसायिक गटात गंधेकर इलेक्ट्रिकल्स यांनी मुंबई फायर ब्रिगेड या संघाचा 37 विरुद्ध 32 अशा 5 गुणांनी पराभव केला. मध्यंतराला मुंबई फायर ब्रिगेड या संघाकडे 8 गुणांची आघाडी होती, मात्र गंधेकर इलेकट्रिकल्स यांनी आपला खेळ उंचावत आधी बरोबरी साधली आणि मग 32-32 अशा समान गुणांवर असताना त्यांच्या सोहम् कनगुटकर याने शेवटच्या चढाईत 3 गुण वसूल करून लोण चढवला आणि सामना 5 गुणांनी जिंकला. गंधेकर इलेकट्रिकल्सतर्फे सोहम् कनगुटकर यांच्यासहित शुभम चौघुले यांनी उत्तम चढाई केल्या आणि विद्युत कोरगावकर याने उत्तम पकडीत 5 गुण हासील करत त्यांना चांगली साथ दिली.




























































