
गणेशोत्सवादरम्यान शहरातील विविध गणपती बाप्पांचे दर्शन भक्तांना घेता यावे यासाठी बेस्टने 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान 25 विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत या ‘गणपती स्पेशल’ बसेस धावणार आहेत. त्यामुळे प्रवासी, पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर दोन वर्षांच्या निर्बंधामुळे उबग आलेल्या मुंबईकरांना आता विघ्नहर्त्यांचे जल्लोषात स्वागत व त्याचे दर्शन घ्यायचे असल्याने एसटी, रेल्वे पाठोपाठ बेस्टही पुढे सरसावली आहे. 31 ऑगस्टला गणपती बाप्पांचे आगमन होत असून शहरातील विविध भागातील गणपतीचे देखावे पाहण्यासाठी गिरणगावात रात्रभर अक्षरश: जत्रा भरलेली असते. त्यामुळे मुंबईकरांच्या सोयीकरीता बेस्टने 25 विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनूसार बसची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
डबलडेकर हेरिटेज बसची सुविधा
31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांना विशेषता फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा येथे रात्रीच्या वेळी गणपतीच्या दर्शनासाठी येणार्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी बेस्टने अलिकडेच सुरू केलेली ‘डबलडेकर’ हेरिटेज ‘होप ऑन होप ऑफ’ बससेवाही फायद्याची ठरणार आहे. रा. 10 ते स. 6 पर्यंत ही सेवा उपलब्ध राहणार असून या ‘डबल डेकर’बसच्या वरच्या मजल्यासाठी 150रू. तर तळमजल्यासाठी 75रू. तिकिट आकारण्यात येणार आहे.
पिकअवरमध्ये ‘स्मार्टकार्ड’धारकांना प्राधान्याने प्रवेश
बेस्टने आपल्या दोनशेहून अधिक बसेसमध्ये ‘टॅप इन टॅप आऊट’ सर्व्हीस सुरू केली आहे.या बसेसमध्ये आता सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या पिकअवरमध्ये ‘चलो अॅप’चे स्मार्ड कार्डधारकांना प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्टने डिजिटलीकरणासाठी ‘टॅप इन- टॅप आऊट’ सेवा सुरु केली आहे. सध्या 16 बस मार्गावरील 200 बसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
या मार्गावर धावणार जादा बस
बसमार्ग क्र. – पासून – पर्यंत
1 मर्या. -ईलेक्ट्रिक हाऊस/कुलाबा आगार – वांद्रे रेक्लेमेशन
4 मर्या. -ओशिवरा आगार – जे.जे.रूग्णालय
7 मर्या. -विक्रोळी आगार – जे.जे.
8 मर्या. -शिवाजी नगर – जे.जे.
66 मर्या. -राणी लक्ष्मीबाई चौक – कुलाबा
202 मर्या. -माहिम बस स्थानक – बोरीवली स्था.पश्चिम
सी 302 -राणी लक्ष्मीबाई चौक – महाराणाप्रताप चौक(मुलुंड)
सी 440 – माहिम बसस्थानक – बोरीवली स्थानक (पुर्व)






























































