गणेशभक्ताने जहाजावरच केली गणरायाची स्थापना; भक्तीभावात पूजाअर्चना सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. कोकणात भक्तीभावात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सावासाठी लाखो चाकरमानी गावोगावी दाखल झाले आहेत. मात्र, अनेकांना इच्छा असूनही उत्सवासाठी गावी येणे शक्य झालेले नाही.

संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावातील तरुण सुमित चिंगळे मरीन इंजिनियर असल्याने सुटी मिळाली नसल्याने तो जहाजावरच आहे. मात्र गणेशोत्सव साजरा करायचाच असे ठरवून त्याने जहाजावरच एका लहानशा जागेत गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. मनात भक्ती असेल तर मार्ग निघतोच, हेच सुमितने दाखवून दिले आहे .

जहाजावर मोठ्या उत्साहात आरती, पूजा, प्रसाद, नैवैद्य अशा भक्तीभावात बाप्पाची पूजाअर्चना सुरू आहे. त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की, दरवर्षी गावाला आम्ही गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करतो. यंदा मात्र कामानिमित्त जहाजावरच असल्याने गावी यायला जमले नाही . त्यामुळे पहिल्यांदाच गणपती उत्सवाला गावाला जात आल नाही ही खंत मनात होती. मात्र, सोबत असलेल्या मित्रांच्या मदतीने जहाजावरच गणेशाची मूर्ती स्थापन करण्याचा विचार मनात आला.

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मोठ्या भक्तीभावात स्थापना केली आणि नित्यनेमाने पूजा, आरती आम्ही करत आहोत. दरवर्षी गावात येणारा उत्सवाचा भक्तीभाव आणि आनंद इकडे मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे त्याने सांगितले. आता जहाजावरील प्रवास सुखकर होवो आणि कोरोनाचे संकट कायमचे दुर होवो असे साकडे गणरायाला घातले असल्याचे सुमितने सांगितले.