14 गावांवरून नवी मुंबईतील भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपली; गणेश नाईकांचा विरोध, मंदा म्हात्रे यांचे समर्थन

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांवरून भाजपच्या दोन आमदारांमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी ही गावे महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र या गावांचे समर्थन केले आहे. १४ गावांवरून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या सुरू असलेल्या वादात आता मंदा म्हात्रे यांनी उडी मारल्यामुळे हा मुद्दा आगामी महापालि का निवडणुकीत तापण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत.

कल्याण तालुक्यातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेमध्ये कोणाच्या तरी लहरीपणामुळे झाला आहे. त्या लहरीपणाचा बोजा आम्ही का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी दोन दिवसांपूर्वी या गावांना पुन्हा विरोध केला. महापालिका निवडणूक झाल्यानंतर ही १४ गावे नवी मुंबईतून बाहेर काढणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला असल्याचा दावा नाईक यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात केला. त्यानंतर बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे या गावांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. या गावांना आपला पाठिंबा आहे, ही गावे महापालिका किंवा शासनाने दत्तक घेतले पाहिजे. ज्यांच्या जमिनी नवी मुंबईसाठी संपादित झाल्या आहेत त्यांचाही विकास झाला पाहिजे, असे म्हात्रे यांनी जाहीर करून अप्रत्यक्षरीत्या नाईक यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.