
पर्यावरण रक्षणासाठी मुंबईत पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवापासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व ताजिया अशा उत्सवात मूर्ती केवळ पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करणे बंधनकारक राहणार आहे. मूर्ती पर्यावरणपूरक नसल्याचे आढळून आल्यास डिपॉझिट जप्त करून दोन वर्षांसाठी नोंदणी रद्द केली जाणार आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची अमल बजावणी करण्या बाबत अतिरिक्त पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित असणाऱया विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यासह सर्वच सण-उत्सवांमध्ये जास्तीत-जास्त पर्यावरणपूरकता जपणे गरजेचे असल्याचे उपस्थित प्रतिनिधींनी नमूद केले.
असे साजरे करा उत्सव
- सजावट करताना ती पाना-फुलांची असावी.
- सिंगल युज प्लॅस्टिक’ हे पूर्णपणे प्रतिबंधित.
- मूर्ती रंगविताना तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणारे रंग हे पर्यावरणपूरक.
- स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मूर्तिकारांची नोंदणी असणे आवश्यक.
- पूजेदरम्यान फुले, पत्री, वस्त्र इत्यादींचा सजावटीसाठी वापर.
- पर्यावरणपूरक पत्रावळींचा वापर करण्याच्या सूचना.
- विसर्जनादरम्यान पर्यावरणपूरकता जपण्याच्या अनुषंगाने नदी, तलाव, समुद्र इत्यादींमध्ये मूर्ती
विसर्जन करण्याबाबत स्वतंत्र सूचना. - घरगुती स्तरावरील मूर्ती विसर्जन हे घरच्या-घरी करण्यास प्राधान्य.

























































