
पर्यावरण, निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धनाचा वसा घेतलेल्या वाकोल्यातील यशवंतनगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली परंपरा कायम ठेवत या वर्षीही कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या साडेसहा फुटी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. सूर्यमंदिरात विराजमान झालेल्या या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंडळाचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 38 वर्षे मंडळाची वाटचाल सुरू आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कागदाच्या लगद्यापासून माटुंगा येथून चितळे यांच्या गणेशशाळेतून बनवलेली मूर्ती आणली जात असून मूर्तीला सिद्धेश पांढरकामे यांनी सजावट केली आहे. मंडपात थेट बाप्पासमोर उभे राहून भाविकांना दर्शन घेता येते. मंडळाचे अध्यक्ष गोविंद गायकर, चिटणीस भरत परुळेकर असून मंडप, सजावट तसेच भाविकांना इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गेला महिनाभर मेहनत घेतली.



























































