ज्याची भक्तगण आतुरतेने वाट बघतात तो बाप्पा अखेर सर्वांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे दहा दिवस गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम असणार. हा सण सर्वांना भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करता यावा, कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी मुंबई पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
गणेशोत्सवात लाखो भक्त शहरातील विविध ठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मोठय़ा संख्येने नागरिक येत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनीदेखील आवश्यक त्या सुविधा केल्या आहेत. शहरात 15 हजार पोलिसांचा फौजफाटा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यात 32 उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2435 पोलीस अधिकारी, 12 हजार 420 अंमलदार असणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट तसेच होमगार्डदेखील बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलिसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास त्याची पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून गणेशोत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पालिका यंत्रणाही सज्ज
मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली असून आगमन-विसर्जनासाठी रस्त्यांची डागडुजी, विसर्जनासाठी 240 कृत्रिम तलाव तैनात करण्यात आले असून शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात एकूण 69 नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाटय़ांवरही गणेश विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शिवाय विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे, तसेच गणेशमूर्ती संकलन पेंद्रे आदी सुविधा असतील अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.