
गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाडय़ांचे 23 जुलै रोजी आरक्षण खुले होताच अवघ्या काही मिनिटांतच गाडय़ा हाऊसफुल्ल झाल्या. आसन क्षमताच संपुष्टात आल्याने रेल्वेगाडय़ांना रिग्रेटचा शेरा मिळत आहे. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तासन्तास तिकीट खिडक्यांवर उभ्या राहिलेल्या प्रवाशांच्या पदरी निराशा पडली.
गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी डेरेदाखल होतात. गणेशोत्सवातील नियमित गाडय़ांची आसन क्षमता संपुष्टात आल्यानंतर ‘रिग्रेट’चा शेरा मिळत होता. यामुळे प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांच्या नजरा गणपती स्पेशल गाडय़ांकडे खिळल्या होत्या. मुंबई-ठोपूर, मुंबई-सावंतवाडी, बांद्रा-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी या गणपती स्पेशलच्या 34 फेऱ्या कोकण मार्गावर धावणार आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना सुखद धक्का दिलेला असतानाच गुरुवारी चारही स्पेशल गाडय़ांचे आरक्षण खुले होताच अवघ्या काही मिनिटांतच आरक्षण फुल्ल झाल्याने हिरमोड झाला आहे.