हमीपत्रातील 4 फूट उंचीची अट वगळली, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यावर्षी ‘पीओपी’ मूर्तीचीही मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीच्या हमीपत्रात 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तींच्या बंधनाची आज पालिकेने हटवली आहे. यामुळे मंडळांना यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

मुंबईत 12 हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तर 1 लाख 90 हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये मंडप बांधून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांना पालिकेची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून पालिकेने ही परवानगी ऑनलाइन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, यावर्षी राज्य सरकार, पालिका आणि समन्वय समितीच्या बैठकीनुसार यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आणि उत्तुंग उंच बनवण्याचा मार्ग मोकळा झाला असताना पालिकेच्या ऑनलाइन हमीपत्रात मात्र ४ फूट आणि पर्यारवणपूरक मूर्तीची अट घालण्यात आल्याने मंडळे संभ्रमात होती. यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यातही अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समितीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.

13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

– श्री गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर 1 ऑगस्ट 2023 पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

– या सुविधे अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा >मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर 1 ऑगस्टपासून 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.