महिलेला बंदी बनवून महिनाभर सामूहिक बलात्कार, भाजप आमदारासह 7 जणांवर गुन्हा दाखल

3358

उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपमधून हकालपट्टी झालेला आमदार कुलदीप सेंगरला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात आणखी एका भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचा आमदार रवींद्रनाथ त्रिपाठीसह 7 जणांवर बुधवारी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदींच्या मतदारसंघातील महिलेला बंदी बनवून एक महिनाभर बलात्कार केल्याचा आरोप या सर्वांवर आहे.

वाराणसीच्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलीस अधिक्षक कार्यालयातमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. पीडितेने भाजप आमदारासह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणी बुधवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हा माझ्याविरोधात रचण्यात आलेला एक कट आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदाराने दिली असून आरोप सिद्ध झाल्यास सहकुटुंब फाशी घेण्यास तयार असल्याचेही भाजप आमदार म्हणाला.

पोलीस अधीक्षक राम बदन सिंह यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, एका महिलेने 10 फेब्रवारी रोजी भाजप आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांचे साथिदार संदीप, सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश आणि नितेश यांनी एका हॉटेलमध्ये महिनाभर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. यादरम्यान पीडिता गर्भवती राहिली आणि आरोपींनी बळजबरीने गर्भपात केला असा आरोपही पीडितेने केला. या प्रकरणी भदोही पोलीस स्थानकात कलम 376 डी, 313, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय तपासणीनंतर कारवाई
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी अप्पय पोलीस अधीक्षक रविंद्र वर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महिलेच्या जबाबीनंतर हॉटेलसह अन्य तथ्यांचा तपास करून भाजप आमदारासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडिते महिलेचा मॅजिस्ट्रेटसमोर जबाब घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या