
पुणे शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी वेगवेगळ्या भागात किरकोळ वादातून मारहाणीच्या चार घटना घडल्या आहेत. लोहियानगर, कासेवाडी, रास्ता पेठ, ओैंध परिसरात मारहाणीच्या घटना घडल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विजर्सन मिरवणूक पाहिल्यानंतर घरी जाणाऱ्याला टोळक्याने अडविले. त्याला पुर्वीच्या भांडणाचा जाब विचारत कुऱ्हाडीने वार केल्याची घटना 10 सप्टेंबरला रात्री दोनच्या सुमारास काशेवाडीत घडली. देवा संजय कांबळे, नजीर वसीम शेख, आसिफ बाबुलल शेख (वय 22, रा. कासेवाडी, भवानी पेठ), अदनान यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल अंबादास भोंगे (वय 20, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहिलची आरोपींबरोबर पाच महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबरला साहिल विसर्जन मिरवणूक पाहून घरी जात होता. त्यावेळी आरोपी कांबळे, शेखने त्याला अडवले. त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीररित्या जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक नितीनुकुमार नाईक तपास करत आहेत.
विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने वार केल्याची घटना 9 सप्टेंबरला महात्मा फुले पेठेतील लोहियानगर भागात घडली. स्वप्नील सतीश साळुंके (वय 25, रा.लोहियानगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश विठ्ठल कांबळे (वय 22, रा. लोहियानगर) याला अटक केली आहे. गणेश विसर्जन मिरवूणकीत नाचताना झालेल्या वादातून वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ तपास करत आहेत.
रास्ता पेठेतील प्रताप मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केली. राहुल दिगंबर कुंजीर (वय 29, रा. गणेश पेठ, दूध भट्टीजवळ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी विराज आम्रे, किरण शिवरकर, यश वालिया (रा. रास्ता पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कुंजीर याचा मित्र देवेंद्र दत्तुर याला आरोपी आम्रे मारहाण करत होता. त्यावेळी राहुल भांडणे सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.
ओैंधमधील इंदिरा वसाहतीत विसर्जन मिरवणुकीत धक्का लागल्याने झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. बाजीराव विजय मोरे (वय 27, रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रस्ता, ओैंध) असे जखमीचे नाव आहे. मोरे आणि त्याचे मित्र वसाहतीतील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी निघाले होते. त्यावेळी धक्का लागल्याने प्रेम वाधमारे, अनिकेत पवार, शुभम गायकवाड, नयन लोंढे, अमित साबळे, आदित्य वाघमारे, मयूर लोंढे, रोहन वाघमारे आणि साथीदारांनी मोरेला बेदम मारहाण केली. दगडफेक करुन परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी सराईत शुभम गायकवाड याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडीक तपास करत आहेत.



























































